शिक्षणासाठी पैसा देऊ पण वेळ नाही

By Admin | Updated: July 1, 2014 00:12 IST2014-06-30T23:48:29+5:302014-07-01T00:12:01+5:30

मल्हारीकांत देशमुख, परभणी आजचा पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणावर हवा तेवढा पैसा उधळू शकतो, पण त्याच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाही.

There is no time to give money for education but I do not have time | शिक्षणासाठी पैसा देऊ पण वेळ नाही

शिक्षणासाठी पैसा देऊ पण वेळ नाही

मल्हारीकांत देशमुख, परभणी
आजचा पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणावर हवा तेवढा पैसा उधळू शकतो, पण त्याच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाही. नामांकीत शाळेत प्रवेश झाला की शिकवणी लावणे, अधून-मधून मुलांची चौकशी करण्यात पालक ईती कर्तव्यता मानतो. लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब आढळून आली आहे.
आपण आपल्या मुलांना अभ्यासासाठी वेळ देता का, या प्रश्नावर पालकांनी थातूर-मातूर उत्तरे दिली. २५ टक्के पालकांनी शालेय स्तरावरील अभ्यासक्रम बोजड आहे. आमच्या वेळची शिक्षण पद्धती वेगळी होती, अशी बतावणी केली तर १० टक्के पालकांनी आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, सोनाराच्या हाताने कान टोचलेले बरे, अशा भूमिकेत जाणवले. त्यातही काम-धाम सांभाळून महिला वर्ग आपल्या मुलांना अभ्यासासाठी वेळ देत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. परंतु हे प्रमाण प्राथमिक स्तरावर म्हणजे पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचेच आहे. १५ टक्के पालकांनी आम्ही दोघेही नोकरी किंवा कामधंद्यासाठी घराबाहेर असतो, असे सांगितले. खाजगी शिकवणी लावण्याचे कारणे शोधली असता सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली की, शाळेतील शिक्षकांपेक्षाही शिकवणीतील शिक्षकांवर पालकांचा अधिक विश्वास असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास होत नाही, असे १५ टक्के पालक म्हणतात. पूर्वापार पद्धतीने दहा वर्षापर्यंतच्या पाल्यांना जवळ बसवून शिकविण्याची पद्धती आता दिसत नाही़
सेमी इंग्रजीचे खूळ
इयत्ता पाचवीपासून सेमी इंग्रजीचे खूळ गेल्या काही वर्षात पालकांच्या डोक्यात बसले आहे.
आता हे लोण ग्रामीण भागातही पोहोचले असून, खाजगी शाळा तर सोडाच जिल्हा परिषदांच्या शाळेतही सेमीचे वर्ग सुरू झाले आहेत. स्वत: निरक्षर मोलमजुरी करणारे पालक सेमी इंग्रजीसाठी हट्ट धरत आहेत.
एका अर्थाने ही बाब स्वागतार्ह मानली तरी या कुटुंबाचा स्तर, घरातील वातावरण विद्यार्थ्याला कुठेच पूरक नसते. मग शाळेच्या कोंडवाड्यात या विद्यार्थ्याचा कोंडमारा होणे स्वाभाविक बाब.
अशा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिकवणी हे एकमेव माध्यम ठरते. शिकवणी वाढीचे हे एक कारण आहे.
शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये ही संकल्पना आणखी काही वर्षानंतर कालबाह्य ठरु शकते. नाव नोंदणीपुरती शाळा आणि शिकण्यासाठी ट्युशन असे समीकरण पुढे येत आहे.
विज्ञान शाखेतील अकरावी-बारावीचे विद्यार्थी अशाच प्रकारे शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल्सचे मार्क्स देणे एवढीच भूमिका शाळा - महाविद्यालयांची उतरणार आहे, असेही पालक बोलून दाखवित आहेत.
शाळेबरोबरच आता मुलांना शिकवणीसाठीही वेळ द्यावा लागतो. म्हणून त्यांचे दैनंदिन जीवन व्यस्त झाले आहे. शाळेमध्ये मुले साधारणत: पाच ते सहा तास असतात.

Web Title: There is no time to give money for education but I do not have time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.