कांद्याला विमा नसल्याने संताप
By Admin | Updated: August 4, 2014 00:48 IST2014-08-04T00:08:43+5:302014-08-04T00:48:32+5:30
विलास भोसले, पाटोदा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत कांदा पिकाचा समावेश नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़
कांद्याला विमा नसल्याने संताप
विलास भोसले, पाटोदा
राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत कांदा पिकाचा समावेश नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़ उसापेक्षा अधिक विम्याचा हप्ता कापसाला असल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
राज्य सरकारचा कृषी विभाग आणि राष्ट्रीय पीक विमा योजना संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या कृषी पिकांना विमा कवच पुरवित आहे़ जिल्ह्यात कापूस, बाजरी, तीळ, तूर, भात, खरीप ज्वारी, भूईमुग, सोयाबीन, सूर्यफूल आदी पिकांना महसूल मंडळ निहाय विमा कवच दिलेले आहे़ असे असले तरी जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळात कांद्याला विमा संरक्षण दिले नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़
जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकरी विविध अडचणींचा सामना करीत आहे़ शेतकऱ्यांसमोर कधी दुष्काळ तर कधी गारपीटचे संकट असते़ यामुळे अनेकदा हातातोंडाशी आलेला घासही हिरावलेल्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत़ त्यामुळे शेतकरी आता दूध पोळाल्याने ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबित असल्याचे दिसून येत आहे़ एकीकडे शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा यासाठी अधिकाऱ्यांसह सर्वच प्रयत्न करीत आहेत़ यामुळे शेतकऱ्यांमध्येही जागृती निर्माण झाली असून शेतकरी पीक विमा भरण्यासाठी बँकेत गर्दीच गर्दी करीत असल्याचे चित्र जिल्हाभरात पहावयास मिळत आहे़ असे असले तरी दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केला आहे़
वास्तविक बीड जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत़ कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान दिले आहे़ तसेच कडा येथे कांदा खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ आहे़ विशेष म्हणजे कडा येथील या बाजारपेठेचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो़ त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी कॉ़ महादेव नागरगोजे यांच्यासह शेतकऱ्यांमधून केली जात आहे़
कापूस पिकाला हेक्टरी २१ हजार २०० रुपयांचे संरक्षण देण्यात आले आहे़ ६० टक्के जोखीम स्तर असलेल्या या पिकाला तेरा टक्के सर्वसाधारण हप्ता आहे़ तर उसाला ८० टक्के जोखीम असून विमा हप्ता केवळ ८ टक्क्यांनीच आकारला जातो़ यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे मत प्रगतीशील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केले़ सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे कांदा पिकाला विम्याचे संरक्षण द्यावे, कापूस पिकासाठी हप्ता कमी करावा, अशी मागणी कांदा उत्पादक विष्णुपंत घोलप यांनी केली आहे़ जिल्ह्यात २००८ मध्ये विदर्भापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या़ अशी वेळ येऊ नये यासाठी कांदा पिकाला तात्काळ विमा संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे़
या संदर्भात तालुका कृषी अधिकारी व्ही़ एस़ बिनवडे म्हणाले की, शासकीय धोरणानुसार विमा हप्ता आकारला जातो़ शेतकऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांना कळविण्यात येईल़
कांद्यालाही द्यावे विमा कवच
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत असतानाही संरक्षण दिले जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर
उसाला जोखीम ८० टक्के व हप्ता ८ टक्के तर कपाशीला जोखीम ६० टक्के व हप्ता १३ टक्के़
यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यावर दुजाभाव होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप