घनसावंगी मतदार संघात ४ हजार मतदारांची वाढ
By Admin | Updated: September 22, 2014 00:53 IST2014-09-22T00:36:58+5:302014-09-22T00:53:42+5:30
घनसावंगी : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आदर्श आचारसंहिता लागू झाली. यामुळे घनसावंगी मतदार संघात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

घनसावंगी मतदार संघात ४ हजार मतदारांची वाढ
घनसावंगी : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आदर्श आचारसंहिता लागू झाली. यामुळे घनसावंगी मतदार संघात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी घनसावंगी येथे पत्रकार परिषदेत दिला. घनसावंगी मतदार संघातील २० सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. २७ सप्टेंबर नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस, २९ सप्टेंबर रोजी छानणी १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस त्याचप्रमाणे १५ आॅक्टोबरला मतदान घेण्यात येणार असून, १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी घनसावंगी येथे होईल. या मतदार संघात सद्य स्थितीला पुरूष मतदार १ लाख ४६ हजार ३२१ तर महिला मतदार १ लाख ३३ हजार २९१ असे एकूण २ लाख ७९ हजार ६१२ मतदार आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ४ हजार मतदारांची वाढ झालेली आहे. ज्या मतदाराचे नाव अद्याप यादीत नाही किंवा नावात बदल झाला असेल त्यांनी तहसीलमध्ये संपर्क साधावा. त्या मतदारांनाही मतदान करता येणार आहे. यादीत नाव किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किंवा तहसील विभागात एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या मतदार संघात महसूल मंडळे येतात. घनसावंगी पूर्ण तालुका, अंबड तालुक्यातून सुखापुरी, गोंदी, वडीगोद्री ही तीन मंडळ जालना तालुक्यातून विरेगाव, पाचनवडगाव ही दोन आहेत. या सर्व मतदार संघात ३२० मतदान केंद्रे असून, यामध्ये तालुक्यात पाच ठिकाणी जास्त मतदार असणाऱ्या ठिकाणी उपकेंद्राची मान्यता घेणार असल्याचे हारकर यांनी सांगितले. मतदार संघात तीन स्थीर पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये रांजणी, उंचेगाव, जांबसमर्थ तर ३ फिरते पथक स्थापण्यात आलेली आहेत. ही सर्व पथक जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्त्याखाली काम करतील. प्रत्येक उमेदवारास खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयांपर्यंत आहे. प्रचार सभा ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आचारसंहिता पथक लक्ष ठेवण्यासाठी राहणार आहेत. (वार्ताहर) व्हिडिओ चित्रीकरणासाठी ४० कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे. मतदार यादीतील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. १२७ अ कलम अंतर्गत प्रिंंटींग प्रेससासाठी आर.डी. अॅक्टचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या उमेदवाराचे बॅनर, पॉम्पलेट, पोलचिटची माहिती निवडणूक विभागाला त्या प्रेसने देणे गरजेचे आहे. नसता त्या प्रेसवर व उमेदवारावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात येईल. १४४ कलम अंतर्गत एका ठिकाणी जास्त व्यक्ती, शस्त्रास्त्र बाळगणे, दारू, हातभट्टी, बिअरबारचे रेकॉर्ड तपासणे, अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ४३२० मतदान केंद्रे ही ५ पोलिस स्टेशन अंतर्गत आहे. यामध्ये अंबड, मौजपुरी, गोंदी, घनसावंगी, जालना ग्रामीण तर मतदार मदत केंद्राची स्थापना तहसील विभागामध्ये करण्यात येणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महसूल मंडळामार्फत जनजागृती करणार असल्याचेही सांगितले.