लठ्ठपणा कमी करण्याच्या आहेत महागड्या शस्त्रक्रिया; खर्च ऐकून लागेल धाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:47 PM2019-09-10T15:47:20+5:302019-09-10T15:53:39+5:30

वजन वेळीच आटोक्यात आले नाही तर करावी लागेल महागडी शस्त्रक्रिया 

There are expensive surgeries to reduce obesity; The cost will be shocking | लठ्ठपणा कमी करण्याच्या आहेत महागड्या शस्त्रक्रिया; खर्च ऐकून लागेल धाप

लठ्ठपणा कमी करण्याच्या आहेत महागड्या शस्त्रक्रिया; खर्च ऐकून लागेल धाप

googlenewsNext
ठळक मुद्देशस्त्रक्रियेवर होत आहेत लाखो रुपये खर्च सोलापुरात होतेय मोफत शस्त्रक्रिया औरंगाबादकरांना फक्त खाजगींचा आधार

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : लठ्ठ व्यक्तीला पाहून पूर्वी तो नक्कीच चांगल्या घरचा आहे, असे म्हटले जायचे. परंतु लठ्ठपणामुळे अनेक आरोग्य समस्यांना व्यक्तीला तोंड द्यावे लागते, हे पुढे समजू लागले व लठ्ठपणा आता आजार ठरतो आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी महागडी शस्त्रक्रिया सोलापूरमधील शासकीय रुग्णालयात मोफत केली जात आहे. औरंगाबादेत मात्र, शासकीय रुग्णालयांत ही शस्त्रक्रिया होत नाही. तर खाजगी रुग्णालयात किमान २ ते ४ लाख रुपये खर्च येतो. परिणामी, सडपातळ होणे सध्या तरी फक्त श्रीमंतांच्या आवाक्यात आहे.

लठ्ठपणाचा हा आजार केवळ श्रीमंतांना होतो. हा समजही आता मागे पडत असून, सर्वसामान्य, गोरगरीब व्यक्तीही वाढत्या वजनाच्या विळख्यात सापडत आहेत. वजन कमी करण्यासाठी हल्ली व्यायामाचे महत्त्व वाढले आहे. परंतु शस्त्रक्रियेने झटपट वजन कमी करण्याचा पर्याय आहे. परंतु हा पर्याय औरंगाबादेत अधिक खर्चीक आहे. 

सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहे. औरंगाबादेत घाटीत ही शस्त्रक्रिया होत नाही. काही खाजगी रुग्णालयांत होते. शिवाय शस्त्रक्रियेसाठी थेट पुणे, मुंबई, इंदूर शहर गाठण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. गोरगरीब रुग्ण मात्र वाढीव वजन, व्याधींसह एक-एक दिवस काढत असल्याची परिस्थिती आहे.

काय आहे ‘बेरियाट्रिक’ सर्जरी?
आहारावर नियंत्रण, व्यायामातूनही वजन कमी करता येते. गुंतागुंतीच्या अवस्थेत लठ्ठपणा कमी करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जरी करण्यात येते. या शस्त्रक्रियेत जठराचा आकार कमी करण्यात येतो. दुसऱ्या एका शस्त्रक्रियेच्या प्रकारात पोट तसेच इतर ठिकाणी वाढलेली चरबी कमी करण्यात येते.

वय १७ वर्षे, वजन १३७ किलो
शहरात बालस्थूलता तज्ज्ञांकडे काही दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगा आला होता. त्याचे वजन तब्बल १३७ किलो होते. सोनोग्राफी तपासणीतून अधिक फॅट असल्याचे निदान झाले. त्यामुळे बेरियाट्रिक सर्जरी करावी लागणार, असे निदान झाले. काही दिवसांपूर्वीच या मुलावर पुण्यात शस्त्रक्रिया झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

शस्त्रक्रिया होऊ शकते
बेरियाट्रिक शस्त्रक्रियेला मेटाबोलिक शस्त्रक्रियाही म्हटले जाते. इतर उपाय जेव्हा काम करीत नाहीत, तेव्हा वजन कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करावी लागते. घाटीत ही शस्त्रक्रिया सध्या होत नाही. त्यासाठी टीमवर्क लागते.  प्रशिक्षणातून आपल्याकडेही ही शस्त्रक्रिया करणे शक्य होऊ शकेल.
- डॉ. सरोजिनी जाधव, घाटी

गुंतागुंतीमुळे शस्त्रक्रियेची वेळ
शस्त्रक्रियेची वेळ येण्यापूर्वी वजन वाढू नये, ही काळजी घेता येते. मात्र, वजन आणि गुंतागुत अधिक असलेल्या व्यक्तींवर ही शस्त्रक्रिया करावीच लागते. अधिक वजनाबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेह अशी अवस्था असते. तपासणीनंतर शस्त्रक्रियेसंदर्भातील निर्णय घेतला जातो. 
- डॉ.प्रीती फटाले, बालस्थूलतातज्ज्ञ

विमा, आरोग्य योजना हवी
बारीक होणे, हा या शस्त्रक्रियेचा एक भाग आहे. मात्र, त्याशिवाय आंतरग्रंथींच्या अनियमित कार्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधी नियंत्रणात आणण्यासाठी ही शस्त्रक्रिया करावी लागते. दुर्बिणीद्वारे ज्याठिकाणी शस्त्रक्रिया होतात, तेथे ही शस्त्रक्रिया शक्य आहे. शस्त्रक्रियेसाठी विमा, शासकीय आरोग्य योजनेचे कवच मिळाल्यास शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढून सर्वसामान्यांना, गोरगरिबांनाही त्याचा फायदा होईल. 
- डॉ. के दार साने, अध्यक्ष, औरंगाबाद सर्जिकल सोसायटी

Web Title: There are expensive surgeries to reduce obesity; The cost will be shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.