देशात करोडो घुसखोर, त्यांना परत पाठवा; उपराष्ट्रपती धनखड यांची दीक्षान्त सोहळ्यात सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:03 IST2025-02-23T06:03:13+5:302025-02-23T06:03:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवाद हाच धर्म आहे. या धर्माच्या विरोधात काही राष्ट्रविरोधी शक्ती काम करीत आहेत. ...

देशात करोडो घुसखोर, त्यांना परत पाठवा; उपराष्ट्रपती धनखड यांची दीक्षान्त सोहळ्यात सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवाद हाच धर्म आहे. या धर्माच्या विरोधात काही राष्ट्रविरोधी शक्ती काम करीत आहेत. देशात करोडोच्या संख्येने अनधिकृत लोक राहत आहेत. दुसरे देश त्यांच्या कायद्यानुसार परत पाठवत आहेत. त्यांच्याकडे ही प्रक्रिया काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम आपल्याकडे कधी सुरू होणार, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, देशात अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांनी इतरांचा रोजगार हिसकावला आहे.
लोकशाही व्यवस्थेत हुकूमशाहीला स्थान नसते
लोकशाही व्यवस्थेत हुकूमशाहीला स्थान नसते. लोकांनी निवडून दिलेले सरकारच या देशात राज्य करू शकते. त्यामुळे निवडणुकीचे पावित्र्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आयोजित भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘संविधान जागर अभियाना’चे उद्घाटन शनिवारी उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते झाले. देशातील प्रत्येकाने संविधानाचा आदर केला पाहिजे. आपल्या संविधानात भारतीय संस्कृतीचे मूळ दडलेले आहे. असेही उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.