पाऊसच नसल्याने धावताहेत २१७ टँकर

By Admin | Updated: July 15, 2014 00:50 IST2014-07-14T23:20:11+5:302014-07-15T00:50:59+5:30

व्यंकटेश वैष्णव, बीड पावसाने बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने पाणी टंचाईची झळ जिल्हयातील बहुतांश गावांना आता जाणवू लागली आहे. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असल्याचे अहवालावरून पहावयास मिळत आहे.

There are 217 tankers running without precipitation | पाऊसच नसल्याने धावताहेत २१७ टँकर

पाऊसच नसल्याने धावताहेत २१७ टँकर

व्यंकटेश वैष्णव, बीड
पावसाने बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने पाणी टंचाईची झळ जिल्हयातील बहुतांश गावांना आता जाणवू लागली आहे. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असल्याचे अहवालावरून पहावयास मिळत आहे.
पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी बीड जिल्ह्यात सरासरी ३.२० मि. मि. एवढाच पाऊस झाला आहे. जिल्हयातील वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव वगळता सर्व तालुक्यांमधून आता पाणी टंचाईची ओरड होऊ लागली आहे.
आज स्थितीत जिल्ह्यात २१७ टँकर सुरू आहेत. यामध्ये १८ शासकीय तर १९९ खाजगी टँकरची संख्या आहे. यामध्ये १८१ गावे तर २९० वाड्यांचा पाणी टंचाई मध्ये समावेश आहे. बीड जिल्हयातील वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव या गावांमध्ये अद्याप पर्यंत तरी पाणी टंचाई निर्माण झालेली नसून परळी तालुक्यात केवळ एकच टँकर सुरू आहे. धारूर तालुक्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची स्थिती काही प्रमाणात चांगली असली तरी देखील धारूर शहरात मात्र पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. यामुळे येथील नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. धनेगाव धरण कोरडे पडले असल्याने धारूरची पाणी टंचाई तीव्र झालेली आहे. धनेगाव धरण कोरडे पडल्याने धारूरला आता जवळच्याच तांदळवाडी पकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. धारूर नगर परिषदेने नुकतेच २७ लाख रूपये खर्च करून ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत केली आहे.
जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात देखील पाण्याची टंचाई मागील दोन वर्षापासून निर्माण झालेली आहे. आज स्थितीत तालुक्यात १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये २७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. १२ विहिरी तर १२ बोअर प्रशासनाने अधिग्रहित केले आहेत.
एकट्या आष्टी तालुक्यात ९७ टँकर सुरू आहेत. तालुक्यात ८१ गावे तर २१७ वाड्यांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अहवाला वरून लक्षात येते. आष्टी शहराला सध्या ब्रम्हगाव तलावावरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आठ-दहा दिवसातून एकदा नळाला पाणी येते. तर ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी सात विहिरी व १८ बोअर प्रशासनाने अधिग्रहित केले आहेत.
अजून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील टँकरची संख्या चारशे ते साडेचारशे पर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
साडेतीन लाख नागरिकांना पाणी पुरवठा
बीड जिल्हयात मागील तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. आज घडीला जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार ४२६ नागरिकांना जिल्हा प्रशासन टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहे.

Web Title: There are 217 tankers running without precipitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.