रूग्णवाहिकेतच आता उपचाराची सुविधा
By Admin | Updated: May 19, 2014 00:15 IST2014-05-18T23:46:01+5:302014-05-19T00:15:23+5:30
हिंगोली : एका दवाखान्यातून दुसर्या दवाखान्यात रूग्णांना रेफर करण्यासाठी आत्तापर्यंत वापरल्या जाणार्या रूग्णवाहिकेतच आता रूग्णांवर उपचार केले जाणार असून
रूग्णवाहिकेतच आता उपचाराची सुविधा
हिंगोली : एका दवाखान्यातून दुसर्या दवाखान्यात रूग्णांना रेफर करण्यासाठी आत्तापर्यंत वापरल्या जाणार्या रूग्णवाहिकेतच आता रूग्णांवर उपचार केले जाणार असून, तशा अत्याधुनिक आयसीयूसारखी व्यवस्था असलेल्या १० रूग्णवाहिका जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. अतिजोखिमेच्या रूग्णास दवाखान्यात पोहचेपर्यंत प्राण गमवावे लागतात. अनुचित घटनेनंतर रूग्णास तात्काळ उपचाराची आवश्यकता भासते. थोडाही उशिर रूग्णांच्या जीवावर बेतू शकतो. म्हणून घटनास्थळावरच रूग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत छोटखानी आयसीयू दवाखान्यासारखी व्यवस्था असलेल्या ९३७ अत्याधुनिक रूग्णवाहिका राज्यतील प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. सामान्य रूग्णवाहिकेचे काम एका दवाखान्यातून दुसर्या दवाखान्यात रुग्णाला पोहोचते करण्याचे असते. त्यात रूग्णांना कसल्याही प्रकारचा उपचार मिळत नाही; परंतु आताच्या नव्या रूग्णवाहिकेत घटनास्थळावरच रूग्णांना उपचार उपलब्ध दिले जात आहेत. म्हणून निव्वळ रेफरसाठी ही रूग्णावाहिका उपयोगात आणता येत नाही. आरोग्य विभागाची तशी सक्ती असल्याने डॉक्टरांना मर्यादा पडतात. शिवाय सामान्य रूग्णालयाशी समन्वय ठेवून जबाबदारीने काम करण्याच्या सुचना आरोग्य विभागाने रूग्णवाहिकेतील डॉक्टरांना दिल्या आहेत. अत्याधुनिक सुविधांमुळे कोणत्याही प्रकारच्या रूग्णांना ही रूग्णावाहिका कामी पडणारी असल्याचे डॉ. फरीन उस्मानी यांनी सांगितले; पण ३० किलो मीटरपेक्षा अधिक अंतरावरील रूग्णांना या रूग्णवाहिकेचा फायदा होणार नाही. सामान्य रूग्णालयापासून ३० कि.मीच्या अंतरावरील रूग्णांसाठी टोल फ्री १०८ क्रमांकावरून रूग्णवाहिकेशी संपर्क साधता येईल. पहिला फोन पुणे येथील मुख्य कार्यालयात लागल्यानंतर तेथून रूग्णवाहिकेच्या पथकातील डॉक्टरांना संपर्क साधल्या जाईल. रूग्णांचे नाव, ठिकाण, आजाराबाबत माहिती देवून अतिजोखीमेच्या ठिकाणी रूग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान रूग्णांना उपचारासह दवाखान्यात दाखल करण्यात येणार आहे. ४० लाखांची रूग्णवाहिका झाडाखाली सामान्य रूग्णालयात नसलेली आयसीयूची व्यवस्था या रूग्णवाहिकेत आहे. एका रूग्णवाहिकेची किंमत ४० लाखांच्या घरात आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा दोन तर जिल्ह्यात एकूण १० रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यापैकी हिंगोली जिल्हा रुग्णालयातील दोन्ही रूग्णवाहिकेसाठी सामान्य रूग्णालयाकडून रेस्टींग रूम देण्यात येणार होते; परंतु रूग्णवाहिका दाखल होवून आठवडा होत असताना रेस्टींग रूमची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी रूग्णालयाच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाखाली या रूग्णवाहिका उभ्या कराव्या लागतात. अत्यंत महत्वाच्या असलेल्या या रूग्णवाहिकेत पावसाचे पाणी जावून साहित्य खराब होण्याची शक्यता आहे. तसेच सुरक्षा नसताना बाजुला असलेल्या रूग्णवाहिका संभाळण्याची तारेवरची कसरत आहे. लवकर रेस्टींग रूम न मिळाल्यास या रूग्णवाहिका खराब होण्यास वेळ लागणार नाही. रूग्णवाहिकेतील डॉक्टरांची टीम २४ तास सेवा देणारी रूग्णवाहिका असल्याने ५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही शिफ्टमध्ये २ पायलट (चालक), ३ डॉक्टर नेमण्यात आले आहेत. एएलसी रूग्णवाहिकेसाठी डॉ. फरीन उस्मानी, डॉ. इनायत खान, डॉ. शिवाजी बेंडके आणि रामसिंग ठाकूर, राजेश सुवर्णकार पायलट आहेत. रूग्णवाहिकेची वैशिष्टे सामान्य रूग्णालयात दाखल झालेली एक रूग्णवाहिका अॅडव्हॉन्स लाईफ सर्व्हिस (एएलस) आणि दुसर्यात बेसीक लाईफ सपोर्ट (बीएलएस) सिस्टीम आहे. एएलसमध्ये महिलांच्या प्रसूतीपासून ते ह्रदयविकरापर्यंतच्या रूग्णांना उपचार देण्याची व्यवस्था आहे. प्रसूती कीट, कृत्रिम आॅक्सीजन, ईसीजी काढणे, रक्तदाब तपासणे, स्लाईन ड्रॉप, ३ स्ट्रेचर, श्वासाचा रस्ता सुरूळीत करणारे यंत्र, फ्रीज, एसी, पेपर नॉपकीन, रूग्णांसाठी लागणार्या सर्व प्रकारच्या नळ्या, वॉशबेसीन, रूग्णांना शॉक देण्याची व्यवस्था, अतिजोखीमेच्या रूग्णांना उपाचार देण्याचे साहित्य देखील उपलब्ध आहे. आयसीयूत मिळणार्या सर्व सुविधा या रूग्णावाहिकेत आहेत.