बुद्धानंतर सिद्धांत बाबासाहेबांचाच
By Admin | Updated: January 15, 2016 00:12 IST2016-01-14T23:54:33+5:302016-01-15T00:12:41+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने ते विश्वमानव आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि तत्त्वचिंतक डॉ. यशवंत मनोहर यांनी गुरुवारी येथे केले.

बुद्धानंतर सिद्धांत बाबासाहेबांचाच
औरंगाबाद : गौतम बुद्धानंतर विश्वाच्या पुनर्रचनेचा सिद्धांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते विश्वमानव आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि तत्त्वचिंतक डॉ. यशवंत मनोहर यांनी गुरुवारी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २२ वा नामविस्तार दिन गुरुवारी साजरा करण्यात आला. डॉ. मनोहर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वपुनर्रचनेचा सिद्धांत’ या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. बी. ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसचिव सिद्धार्थ खरात, कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांच्यासह डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सुहास मोराळे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. डॉ. मनोहर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण १९५६ मध्ये झाले. महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांची उंची आणि खोली वाढते आहे. त्यामुळे याच दिवशी विश्वमानवाच्या विचारांचा जन्म झाला असे मी मानतो. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने विचारांची उंची आणि बौद्धिक क्षमता वाढविण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी विश्वाचे कल्याण हाच विचार आयुष्यभर केला आणि तसे कामही केले. यावेळी डॉ. मनोहर यांनी लोकाग्रहास्तव ‘जपून रे माझ्या फिनिक्स पक्ष्यांनो जपून’ ही कविता सादर केली.
यावेळी खरात यांनी, नामांतराच्या चळवळीचे धगधगते अग्निकुंड विझू न देता बाबासाहेबांचे विचार कृतीतून पुढे न्यावेत, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. चोपडे म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांचे गारुड हजारो वर्षे माणसांच्या मनावर अधिराज्य करीत राहील. मागील २१ वर्षांत झालेल्या विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा डॉ. शिरसाट यांनी प्रास्ताविकात घेतला. डॉ. उत्तम अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मोराळे यांनी आभार मानले.