...तर पिके तग धरू शकतील
By Admin | Updated: July 6, 2015 00:17 IST2015-07-05T23:50:02+5:302015-07-06T00:17:10+5:30
जालना : जिल्ह्यात गेल्या १२ ते १५ दिवसांपासून पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे मूग, उडीद या पिकांना सद्यस्थितीत धोका वाटत असला तरी शेतकऱ्यांनी पिकांना

...तर पिके तग धरू शकतील
जालना : जिल्ह्यात गेल्या १२ ते १५ दिवसांपासून पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे मूग, उडीद या पिकांना सद्यस्थितीत धोका वाटत असला तरी शेतकऱ्यांनी पिकांना लागणाऱ्या पोटॅश व नायट्रेट यांचे मिश्रण असलेली औषध फवारणी केल्यास पिके तग धरू शकतील, असे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
गंजेवार म्हणाले, जिल्ह्यात सर्वदूर २३ जून रोजी पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिलेली आहे. सरासरी १३५ मि.मी. पाऊस झाल्याने तो समाधानकारक आहे. परंतु १२ ते १५ दिवसांचा खंड पडल्याने पिकांना धोका असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. जिल्ह्याचे खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ६१ हजार हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ४ लाख ४२ हजार हेक्टरमध्ये (७९ टक्के) पेरणी झालेली आहे.
सर्वसाधारणपणे १५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड पडल्यास सुरूवातीला मूग व उडीद या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतरही पाच-सहा दिवस पाऊस न झाल्यास सोयाबीनला आणि नंतर आणखी आठ दिवस म्हणजेच महिनाभर पावसाची उघडीप कायम राहिल्यास कपाशीला धोका निर्माण होऊ शकतो, असे गंजेवार म्हणाले.
हलक्या जमिनीवरील पिके लगेच वाळू शकतात. त्यानंतर मध्यम व भारी असा पिके वाळण्याचा क्रम लागतो. परंतु पिकांना धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी औषध फवारणी करावी. जमिनीतून अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी पिकांना पाण्याची गरज असते.
सूर्यप्रकाश, हवेतील कार्बनडाय आॅक्साईड देखील पिकांना हवा असतो. ही गरज पोटॅश व नायट्रेटचे मिश्रण असलेली औषधी भागवू शकते. काही सेंद्रीय तज्ज्ञांच्या मते जीवामृत फवारणी देखील अशा काळात पिकांना वाचवू शकते, असेही गंजेवार यांनी सांगितले.
कृषी विकास अधिकारी गंजेवार पुढे म्हणाले, जमिनीमध्ये सेंद्रीय कर्बाचे (ह्युमस) प्रमाण अत्यंत कमी आहे. परिणामी झाडे सकस नाहीत. जनावरांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे पावसाचा खंड अपेक्षेपेक्षा अधिक झाल्यास पिकांना तग धरून ठेवण्याची क्षमता त्या जमिनीमध्ये राहिलेली नाही. त्यासाठीच अशा औषधींची फवारणी करावी लागते. १९-१९-१९ या औषधीचीही फवारणी काहीजण करतात. जलयुक्त शिवार अभियानामुळे बऱ्याच ठिकाणी नाल्यांना पाणी आलेले आहे, त्यामुळे स्प्रींकलर सेटद्वारेही शेतकरी पिकांना पाणी देऊ शकतात. (प्रतिनिधी)
स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त १ जुलै रोजी कृषीदिन साजरा करण्यात आला. याच निमित्ताने ६ ते ९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात तालुकानिहाय शेतकऱ्यांना मोफत तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येत असल्याचेही कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती त्यात देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या संमतीने शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षणासाठी उपकरात १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही गंजेवार यांनी दिली.