...तर सिडको एन-२ मधील क्रिकेट स्टेडियमची जप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:34 IST2017-11-15T00:34:27+5:302017-11-15T00:34:33+5:30
एन-२ येथील क्रिकेट मैदानाचे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे अतिरिक्त भाडेपट्टा प्रीमियमचे ७० लाख रुपये थकले असून, सिडको प्रशासनाने असोसिएशनला ३० दिवसांत रक्कम न भरल्यास स्टेडियमवर जप्तीची कारवाई होईल, अशी नोटीस बजावली आहे.

...तर सिडको एन-२ मधील क्रिकेट स्टेडियमची जप्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एन-२ येथील क्रिकेट मैदानाचे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे अतिरिक्त भाडेपट्टा प्रीमियमचे ७० लाख रुपये थकले असून, सिडको प्रशासनाने असोसिएशनला ३० दिवसांत रक्कम न भरल्यास स्टेडियमवर जप्तीची कारवाई होईल, अशी नोटीस बजावली आहे.
सिडकोच्या स्थापनेनंतर १९९० च्या दशकात जिल्हा क्रिकेट असोसिएशनला ही जागा भाडेकरारावर देण्यात आली. सहा वर्षांनंतर संबंधित लीजडीडधारकांनी करारानुसार विकास केला नाही, तर सिडको जागा ताब्यात घेते व पुन्हा लिलाव करते. मात्र, मागील तीन दशकांपासून क्रिकेट असोसिएशनचे मैदान हिरवळ आणि संरक्षक भिंत बांधकामाच्या पलीकडे सरकलेले नाही.
रात्रीच्या वेळी त्या मैदानाच्या अवती-भोवती तळीरामांची बैठक असते. आसनव्यवस्थेची पूर्णत: वाट लागलेली आहे. मैदानाची दुरवस्था हा संशोधनाचा विषय असून, सध्या तरी सिडकोने ७० लाख रुपये वसुलीसाठी नोटीस बजावली आहे.