अभिनव मैफल! सूरमयी पहाटेचा नजराणा वाहून माता रमाईपुढे नतमस्तक झाली तरुणाई

By साहेबराव हिवराळे | Published: February 7, 2024 06:31 PM2024-02-07T18:31:08+5:302024-02-07T18:39:21+5:30

त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि कलाकारांतर्फे ‘रमाई पहाट’ ही अभिनव मैफल शहरात पहिल्यांदाच आयोजित केली होती.

The youth bowed before Mata Ramai Ambedkar with the sight of the beautiful dawn | अभिनव मैफल! सूरमयी पहाटेचा नजराणा वाहून माता रमाईपुढे नतमस्तक झाली तरुणाई

अभिनव मैफल! सूरमयी पहाटेचा नजराणा वाहून माता रमाईपुढे नतमस्तक झाली तरुणाई

छत्रपती संभाजीनगर : बुधवारची पहाट सिडको कॅनाट परिसरात सळसळती तरुणाई, कलावंतांचे भीमवादळच घेऊन आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त सूरमयी अभिवादन करताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलावंतांनी आपल्या कलागुणांची खाण येथे रिती करीत रमाईला अभूतपूर्व मानवंदना दिली. शुभ्रवस्त्रात आलेल्या हजारो शहरवासीयांनी गीतगायन, वादन, ढोल, हलगी, फ्लॅश मॉब, डीजेंसह अनेक कलासादरीकरणाच्या या स्मृती आपल्या हृदयात बंदिस्त केल्या.

त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि कलाकारांतर्फे ‘रमाई पहाट’ ही अभिनव मैफल शहरात पहिल्यांदाच आयोजित केली होती. प्रारंभी सामूहिक बुद्धवंदना आणि समता सैनिक दलाच्या महिला पथकाकडून माता रमाईंना सलामी देण्यात आली. रमाई वंदनगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गायन, वादन, कविता, ढोलपथक, लेझीम, हलगीवादन, फ्लॅश मॉब, डान्स, रॅप तथा डीजेंनी कलाप्रकार सादरीकरणाची ही धूम दुपारी १२.३०पर्यंत रंगत गेली. कार्यक्रमानंतर संयोजकांनी परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाची सांगता सांगता राष्ट्रगीताने झाली.

सारेगम रिॲलिटी शो फेम आंबेडकरी सुफी गायिका आणि भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांच्या कन्या रागिणी बोदडे, ‘तुझ्या रक्तामधला भीमराव पाहू दे’ आणि गायिका भाग्यश्री इंगळे, ‘काळजावर कोरलं नाव भीमा कोरेगाव’ फेम गायक अजय देहाडे, आंबेडकरी गझलकार चेतन चोपडे, गायक सचिन भुईगळ, ‘मेरा भीम जबरदस्त’ फेम कुणाल वराळे, सुफी गायक विजय पवार, प्रख्यात शास्त्रीय गायिका प्रज्ञा वानखेडे, प्रख्यात आंबेडकरी गायिका निकीता बंड यांनी एकापेक्षा एक बहारदार बुद्ध-भीम व रमाईची गीते सादर करून माता रमाईंना मानवंदना दिली. सूरवाद्य प्रकारात विक्रम पवार यांनी पिंपळाचे पान वाजवून रमाईचे गीत सादर केले. त्यांच्या या लक्षवेधी सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

मुंबईचे मराठी रॅपर राज मुंगसे, जे. सुबोध, अजित, गोकू आणि एएक्सएस बॉय यांच्या अफलातून सादरीकरणाने उपस्थितांना रॅपच्या तालावर डोलायला लावले. या आंबेडकरी रॅपर्सनी रॅपच्या माध्यमातून प्रबोधन करून ‘रमाई पहाट’ समृद्ध केली. अयुब यांच्या नेतृत्वातील नागपूरचा पोट्टा आणि ग्रुपने सादर केलेल्या आंबेडकरी फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाला तर उपस्थितांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अविनाश भारती, अमोल कदम यांनी कविता सादर केल्या. कैलासनगरच्या प्रियदर्शी सम्राट अशोक युवा मंचचे लेझीम पथक, सुनील दणके यांच्या नेतृत्वातील कन्नडचा ओमसाई हलगी ग्रुप, मृणाल गजभिये यांचे धम्मनाद ढोलपथक, डीजे मयूर आणि डीजे एचके स्टाईल यांच्या सादरीकरणाने तरुणाईला झिंग आणली. 

मीनाक्षी बालकमल आणि सद्दाम शेख या जोडगोळीने या कार्यक्रमाचे दिलखेचक आणि समर्पक निवेदन केले. आंबेडकरी चळवळीचा तरुण चेहरा विजय वाहूळ, प्रसिद्ध गायक अजय देहाडे, सचिन भुईगळ, चेतन चोपडे, कुणाल वराळे, अक्षय जाधव, संदीप वाहूळ आणि रवी वाहुळे यांच्या पुढाकारातून या अभिनव अभिवादन सभेचे आयोजन केले होते.

Web Title: The youth bowed before Mata Ramai Ambedkar with the sight of the beautiful dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.