मुख्याध्यापकाची १३ दिवसांत १७०० कि.मी. सायकलिंग; छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका मोहिम फत्ते!
By जयंत कुलकर्णी | Updated: November 6, 2025 14:18 IST2025-11-06T14:17:43+5:302025-11-06T14:18:41+5:30
दिवाळी आणि उन्हाळीच्या सुट्टीचा उपयोग सायकलिंगची आवड जपण्यासाठी

मुख्याध्यापकाची १३ दिवसांत १७०० कि.मी. सायकलिंग; छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका मोहिम फत्ते!
- जयंत कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर : आवड असली तरी सवड मिळतेच असे म्हणतात, ते उगीच नाही. अनेक जबाबदाऱ्या असलेली मुख्याध्यापकाची नोकरी, मात्र दिवाळीत मिळणारी सुट्टी असो की, उन्हाळ्यात त्याचा पुरेपूर फायदा सायकलिंगची आपली आवड जपली आहे ती छत्रपती संभाजीनगर येथील सुधाकर पवार यांनी. त्यांनी गतवर्षी ९ दिवसांत १३७० मि. सायकल चालवत श्रीरामाची अयोध्या गाठली आणि यंदा सायकलिंग करीत १३ दिवसांत १७०० कि. मी.चे अंतर कापताना श्रीलंका गाठले. उल्लेखनीय बाब म्हणजे सायकलमधील वारंवार बिघाड, ऊन पावसाचा खेळ, विरुद्ध दिशेने वाहणारे वारे आणि रस्त्यावरचे चढउतार यावर यशस्वी मात करीत शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पणाला लागलेली ही मोहीम फत्ते केली.
४७ वर्षीय सुधाकर पवार हे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. पद्मसिंह पाटील विद्यालयात मुख्याध्यापक. मात्र, दिवाळी आणि उन्हाळीच्या सुट्टीचा उपयोग त्यांनी सायकलिंगची आवड जपण्यासाठी केला. त्यांनी २०२२ ते आजतागायत छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली, कोलकाता, कन्याकुमारी, काठमांडू, वाराणसी, अयोध्या, पॉण्डेचेरी आणि द्वारका असा सायकल चालवून जीवनाचा खरा आनंद लुटला.
यंदा दिवाळीत त्यांची मोहीम होती ती श्रीलंका. १५ ऑक्टोबर रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून या मोहिमेचा श्रीगणेशा केला. बीड, सोलापूर, बिजापूर, हॉस्पेट, चित्रदुर्ग, बंगळुरू, नागापट्टणम बंदर असा सायकलवर प्रवास केला. त्यानंतर १११ कि. मी.चा पाच तासांचा प्रवास बंगालचा उपमहासागर ओलांडून जाफनातील कनकेसंथुराई असा प्रवास केला. त्यानंतर पुन्हा अनुराधपुरा आणि सिगीरिया असा सायकलिंगने केला.
ऊन पावसाचा खेळ
छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका मोहिमेदरम्यान सायकल चालवताना लोकांचा प्रतिसाद मिळत होता. पहाटे सात ते सायंकाळी सात या वेळेत दीडशे कि. मी. सायकलिंग करण्याचे नियोजन होते. गुगलमॅपचा आधार घेऊन एखाद्या मोठ्या शहरात अथवा एखाद्या धाब्यावर रात्र काढावी लागत असे. यादरम्यान दोन ते तीन वेळा सायकल नादुरुस्त झाली. तसेच तामिळनाडूतील चिदंबरम ते नागापट्टणम यादरम्यान जोरदार पावसाची एन्ट्री झाली. एवढेच नव्हे तर मनात भीतीची भावना न येऊ देता तामिळनाडू व कर्नाटक बॉर्डरवर निर्जन आणि अंधारात सायकलिंग केल्याचे पवार म्हणतात.
त्यामुळे विमानाने आणावी लागली सायकल
परतताना जाफना ते भारतातील नागापट्टणम बंदर या मार्गावरील बोटसेवा बंद झाल्यामुळे सायकल विमानाद्वारे आणावी लागली. श्रीलंकेत तमिळ व सिंहली भाषाच बोलली जाते. त्यामुळे इंग्लिशमध्येच संवाद साधावा लागला. व्ही. उमाहरन या व्यक्तीने श्रीलंकेत राहण्याची आणि सायकल पार्सल करण्यासाठी आणि प्रवासाविषयी मार्गदर्शन केल्याचे पवार यांनी सांगितले.
मित्र सचिन देशमुख यांच्यामुळे २०१८ मध्ये सायकलिंगचा छंद जडला. त्यानंतर अंतर वाढवतच नेले व देशभरात सायकलिंग केली. दोन वर्षांपूर्वी सायकलवरून श्रीरामाची अयोध्या केली आणि आता रावणाची लंका केली. अशा या प्रवासाच्या निमित्ताने सायकल प्रवासाचा ‘राम सेतू’ही जोडून टाकला याचा मनस्वी आनंद वाटतोय.
- सुधाकर पवार