पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीचे आमिष; तीन लाखांना फसवले
By राम शिनगारे | Updated: August 20, 2023 20:51 IST2023-08-20T20:51:24+5:302023-08-20T20:51:48+5:30
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीचे आमिष; तीन लाखांना फसवले
छत्रपती संभाजीनगर : पोस्ट ऑफीसमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाने ३६ वर्षीय तरूणास ३ लाख रूपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तरुणाच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ओमप्रकाश नारायण गायकवाड (रा.कुकुडगाव-सुकापुरी, ता.अंबड, जि.जालना) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेध तुपे (रा.रामनगर, मुकुंदवाडी) हा तरूण नोकरीच्या शोधात होता. तेव्हा त्यास ओळखीचा ओमप्रकाश गायकवाड याने पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीचे अमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी सुमेध तुपे याचा विश्वासही आरोपीने संपादन केला. त्यानंतर गायकवाडने सुमेधकडून वेळोवेळी फोन-पे, गुगल पे आणि रोखीने ३ लाख रूपये घेतले होते.
पैसे देवूनही नोकरी लागत नसल्याने सुमेध तुपे याने त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. तेव्हा आरोपीने उडवा -उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुमेधने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. त्याठिकाणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक समाधान विठोरे करीत आहेत.