छत्रपती संभाजीनगर : भाजीपाला घेऊन घराकडे निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील १ तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून धूम ठोकणाऱ्या बुलेटस्वार दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या अर्ध्या तासाच्या आत बेड्या ठोकल्या. ही घटना दि. २५ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास सिडको एन-४ भागात घडली होती. अंकुश संतोष राठोड (२३, रा. मूळ जिंतूर, ह. मु. मुकुंदवाडी), निखिल नयबराव चव्हाण (२२, रा. मंठा, जि. जालना, ह. मु. गारखेडा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी लताबाई ज्ञानेश्वर शिरसाट (६०, रा. आदित्य वुड्स सोसायटी, एन-४) या भाजीपाला खरेदी करून घराकडे पायी निघाल्या होत्या. समृद्धी रेसिडेन्सीच्या कॉर्नरजवळ विना क्रमांकाच्या बुलेटवर दोघेजण आले. त्यांनी लताबाई यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून धूम ठोकली. घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना प्राप्त होताच निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी तत्काळ विशेष पथकाला आरोपींच्या शोधार्थ रवाना केले. आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू करीत दोन्ही आरोपींना अर्ध्या तासात पकडले.
एक वाहने पुसतो, दुसरा फरशी बसवतोआरोपी अंकुश राठोड हा सकाळी वाहने पुसण्याचे काम करतो. तर निखिल चव्हाण हा फरशी बसविण्याचे काम करतो. दोघांकडे महागडी बुलेट, मोपेड असून त्यावर दोघेही चेन स्नॅचिंग करीत असल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल चेन स्नॅचिंगचा गुन्हादेखील यांनीच केल्याची कबुली दिली आहे.