छत्रपती संभाजीनगर : दुबईतील कंपनीकडून विविध उद्योग वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून आळंदीच्या एका ठगाने शहरातील शेतकऱ्याची ५० लाखांची फसवणूक केली. अनिल गोविंदा शिंदे (रा. काळे गल्ली, आळंदी) असे त्याचे नाव असून सिडको पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकरी असलेले चंद्रभान बापूराव वटाणे (वय ७२, रा. बजाजनगर) यांचे नातू २०२१-२२ मध्ये आळंदीत शिक्षणासाठी राहत होते. त्या दरम्यान वटाणे यांची शिंदेसोबत ओळख झाली. त्या दरम्यान त्याने त्याची दुबईत कंपनी असून लोकांना श्रीमंत होण्यासाठी कंपनी, ट्रस्ट, धर्मादाय संस्था, गोशाळांना पैसे देत असल्याची थाप मारली. ५ लाख दिले तर १५ लाख रुपये देतो, असे आमिष दाखवले. अनेकदा त्याने त्यांच्या बजाजनगरच्या घरी येत फंडिंगसाठी एखादी कंपनी शोधण्याचा सल्ला दिला. वटाणे यांचे मित्र गौतम पाईकराव (रा. हातेडी, परतूर) यांची पशु खाद्य निर्मिती करणारी समर्थ फार्मर नावाने कंपनी असून त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे वटाणे यांनी पाईकराव व शिंदेची भेट घडवली.
पैसे जमवा, परतावा तिप्पट मिळेलशिंदे वारंवार पाईकराव, वटाणे यांच्याकडे येत होता. त्या दरम्यान त्याचा मेहुणा सुशीलकुमार दिलीपकुमार तायडे (रा. पुणे) व हरी नारायण महाजन (रा. मुंबई) हे सोबत असायचे. त्यांनी देखील तक्रारदाराला पैसे जमवा, परतावा तिप्पट मिळेल, असे आश्वासन दिले. शिंदेने त्याच्या कंपनीची कागदपत्रे, आयटी रिटर्नच्या प्रती दिल्या. ५०० रुपयांचे दोन कोरे बॉण्ड दिले. मिळणारी रक्कम करमुक्त असेल, अशी थाप मारली. वटाणे, पाईकराव यांनी नातेवाइकांकडून पैसे जमवून शिंदेला ५० लाख रुपये दिले. शिंदेने त्यांना दीड कोटी देण्याचे आश्वासन दिले.
पैसे मिळताच सूंबाल्या१८ मार्च, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिंदे वटाणे यांच्या घरी गेला. ५० लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर सिडकोच्या एसबीआय बँकेत कामासाठी जात असल्याचे सांगून गेला. तुम्हाला तीन तासांत दीड कोटी मिळतील, असे सांगितले. मात्र, सहा महिने उलटूनही वटाणे, पाईकराव यांना एकही रुपया परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वटाणे यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे तक्रार केली. सहायक निरीक्षक योगेश गायकवाड तपास करत आहेत.