रेल्वे ट्रॅकची तपासणी करणऱ्या अभियंत्यास लुटले, जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल
By राम शिनगारे | Updated: April 20, 2023 21:01 IST2023-04-20T21:01:30+5:302023-04-20T21:01:44+5:30
सकाळी १० वाजता शिवाजीनगर परिसराती घडली घटना

रेल्वे ट्रॅकची तपासणी करणऱ्या अभियंत्यास लुटले, जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थकानकाच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकची तपासणी करीत असलेल्या अभियंत्यास शिवाजीनगर परिसरात दोन जणांनी लुटल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा जबरी चाेरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोपट कारभारी नलावडे हे रेल्वेत किमॅन सीनीयर सेक्शन इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. १९ एप्रील रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास चिकलठाणा ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन या रेल्वे ट्रॅकवरील टी.पी. पोलजवळ ट्रॅकची तपासणी करीत होते. त्यावेळी दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी कामकाज समजावून घेण्याचा प्रयत्न केला. नलावडे यांनी काम कसे चालते त्याविषयी माहिती दिल्यानंतरही दोघांनी राग आल्याचे दाखवत त्यांना मारहाण सुरू केली.
शिविगाळ देऊन जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी दोघांपैकी एकाने नलावडे यांच्या खिशातील ७५० रुपये बळजबरीने काढुन घेतले. त्यानंतर मोबाईल काढण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा नलावडे यांनी केसावाल्या तरुणाच्या हाताला कडकडुन चावा घेतला. त्यामुळे त्यांचा मोबाईल वाचला. या प्रकरणी जवाहरनगरमध्ये गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संतोष राऊत करीत आहेत.