पदव्युत्तर परीक्षेत कुलगुरूंसह भरारी पथकांच्या धाडसत्रामुळे निकालाचा टक्का घसरला
By राम शिनगारे | Updated: August 2, 2025 12:35 IST2025-08-02T12:31:20+5:302025-08-02T12:35:25+5:30
अनेक विषयांचा निकाल ५० टक्क्यांहून कमी, तर बहुतांश अभ्याक्रमांचे निकाल ७५ टक्क्यांहून कमी लागले

पदव्युत्तर परीक्षेत कुलगुरूंसह भरारी पथकांच्या धाडसत्रामुळे निकालाचा टक्का घसरला
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कुलगुरूंसह इतर भरारी पथकांनी कॉपीमुक्तीसाठी धाडसत्र अवलंबिले होते. त्याचा परिणाम निकालांवर झाल्याची आकडेवारी आली आहे. अनेक विषयांचा निकाल ५० टक्क्यांहून कमी, तर बहुतांश अभ्याक्रमांचे निकाल ७५ टक्क्यांहून कमी लागले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील वर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत विद्यापीठातील प्राध्यापकांची भरारी पथके नेमली होती. त्यावेळी काही पथकांचा अपवाद वगळता जास्त प्रमाणात कारवाया करण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र, एप्रिल-मे महिन्यात घेतलेल्या चारही जिल्ह्यांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रांना थेट कुलगुरू डॉ. फुलारी यांनीच अचानकपणे भेटी देऊन कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण परीक्षा परफॉर्मन्स रद्द केला. अनुपस्थित प्राचार्यांना ५० हजार रुपये दंड ठोठावला. कुलगुरूंशिवाय परीक्षा संचालक डॉ. डोळे, विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. अभिजित शेळके यांच्या भरारी पथकांनीही कारवाई केली. त्याचे परिणाम निकालात दिसून आले. विद्यापीठाने घेतलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले.
या अभ्यासक्रमांचे निकाल घसरले
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जाहीर झालेल्या निकालात एम.ए. अर्थशास्त्र विषयाचा निकाल ५७.१४ टक्के लागला आहे. त्याशिवाय एम.ए. इंग्रजी ४९.६६ टक्के, भूगोल ६६.६७, इतिहास ५३.८५, गृहविज्ञान ६६.६७, मराठी ५३.३७. संगीत ६३.६४, मानसशास्त्र ६०, उर्दू ५८.३३, राज्यशास्त्र ६५.७१, एम.एस्सी बायोटेक्नॉलॉजी ६६.६७, बॉटनी ५६.०१, फॉरेन्सिक ॲप्लाइड फिजिक्स ॲण्ड बॅलिस्टिक्स, भौतिकशास्त्र ६९.२३, रसायनशास्त्र ९.८५, एम.कॉम ६३.०५, ई-कॉमर्स विषयाचा निकाल ६० टक्के लागला आहे. ७५ पैकी केवळ एम.ए. आरेबी, वृत्तपत्रविद्या, फाइन आर्ट, एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स, हर्बल टेक्नॉलॉजी आणि डीबीएम या एकाच विभागात चालणाऱ्या अभ्यासक्रमांचे निकाल १०० टक्के लागले आहेत, उर्वरित सर्व अभ्यासक्रमांचे निकाल घसरल्याची माहिती संचालक डॉ. डोळे यांनी दिली.
काॅपीमुक्त परीक्षेला प्राधान्य
पदव्युत्तर अभ्यासक्रमच नव्हे तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षाही काॅपीमुक्त घेण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार परीक्षा यंत्रणेत बदल करण्यात येत आहेत.
-डॉ. बी. एन. डोळे. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठ