स्टाफ नर्सची ‘ती’ यादी संशयाच्या भोवऱ्यात; पेनाने तारखेचा उल्लेख, आणखी काय काय सापडलं?
By संतोष हिरेमठ | Updated: June 4, 2025 13:06 IST2025-06-04T13:04:32+5:302025-06-04T13:06:27+5:30
प्रति उमेदवार १५ ते २० लाख रुपये घेऊन ही कागदपत्रे पडताळणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्टाफ नर्सची ‘ती’ यादी संशयाच्या भोवऱ्यात; पेनाने तारखेचा उल्लेख, आणखी काय काय सापडलं?
संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: परीक्षेतील गुणवत्ता यादीत पात्र ठरलेल्या २५ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आल्याचे पत्र उघडकीस आले आहे. हे उमेदवार गुणवत्ता यादीत पात्र ठरल्याचे पत्रात उल्लेख आहे. परंतु यादीतील एकाही उमेदवाराच्या नावापुढे मेरिट नंबरचा उल्लेखच नाही. शिवाय या उमेदवारांचे नाव पात्रता यादीतही नाही. प्रति उमेदवार १५ ते २० लाख रुपये घेऊन ही कागदपत्रे पडताळणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अधिनस्थ संस्थांमधील अधिपरिचारिका (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर २०२४ मध्ये गुणवत्ताधारक आणि पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये स्टाफ नर्स म्हणून हे उमेदवार रुजू झाले आहेत. परंतु यातील काही जण अपात्र असतानाही यंत्रणेतील काहींनी आर्थिक ‘उद्योग’ करून नियुक्ती केल्याचे समजते. अशीच एक २५ जणांची यादी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पेनाने तारखेचा उल्लेख
- २५ उमेदवारांना मुंबईतील दोन रुग्णालयांत कागदपत्र पडताळणीसाठी २९ आणि ३० एप्रिल २०२४ रोजी बोलावण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे हे पत्र असून, त्यात हे उमेदवार गुणवत्ता यादीत पात्र असल्याचा उल्लेख आहे.
- हे उमेदवार पात्र असतील तर मग त्यांच्या नावापुढे मेरिट नंबरचा उल्लेख का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे कागदपत्र पडताळणीची तारीख चक्क पेनाने लिहिलेली आहे. यातील काही उमेदवार राज्यभरात रुजू झालेले असल्याचे सांगण्यात आले.