विवेकानंद चौकातील जागी ठाणे खोडून कॉम्प्लेक्सच्या हालचाली
By Admin | Updated: May 13, 2014 01:08 IST2014-05-12T23:42:26+5:302014-05-13T01:08:46+5:30
दत्ता थोरे , लातूर शहरातील विवेकानंद चौकात जवळपास दोन एकर रिकामी करण्यात आलेल्या जागेवर पोलिस ठाणे खोडून कमर्शिअल कॉम्लेक्स उभारण्याच्या हालचाली सुरू आहे़

विवेकानंद चौकातील जागी ठाणे खोडून कॉम्प्लेक्सच्या हालचाली
दत्ता थोरे , लातूर शहरातील विवेकानंद चौकात जवळपास दोन एकर रिकामी करण्यात आलेल्या जागेवर पोलिस ठाणे खोडून कमर्शिअल कॉम्लेक्स उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचे मनपातील अधिकृत सूत्राने ‘लोकमत’ला सांगितले़ ही बातमी फुटताच जिल्हा पोलिस प्रशासनाने तातडीने जिल्हाधिकार्यांकडे नव्याने मंजूर झालेल्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्यासाठी ही जागा देण्याचे पत्र जिल्हाधिकार्यांना सुपुर्द केले़ तर दुसरीकडे ही जागा बिल्डर लॉबींपासून वाचवून पोलिस ठाण्यासाठीच मिळावी, यासाठी सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनही दिले़ लातूर शहराचा पूर्वभाग असलेल्या विवेकानंद चौकात पाण्याच्या टाकी शेजारी मोठी जागा रिकामी आहे़ या जागेवरील अतिक्रमण मनपाने काही महिन्यापुर्वीच काढले असून, सध्या येथील रिकामी जागा कंत्राटदारांच्या डोळ्यांना सळत आहे़ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मंजूर झालेल्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्याला ही जागा मिळावी, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील होते़ यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातून मनपा आयुक्तांबरोबर चर्चाही चालू होत्या़ परंतू मनपा व बिल्डर लॉबी दबाव टाकून याठिकाणी कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले़ व्यापारी संकुल उभारून मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल, असा युक्तीवाद काही कंत्राटदारांनी मनपा प्रशासन चालवित असल्याच्या चर्चेला उधान आले आहे़ या भागात वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेवून प्रशासनाने भव्य पोलिस ठाणे उभारून उर्वरित जागेत नाना-नानी पार्कच्या धर्तीवर जॉगिंग ट्रॅक उभारावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे़ जागा बिल्डर लॉबी बळकावत असल्याची भनक लागताच पोलिस प्रशासनानेही जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन ठेवले आहे़ आता मनपा शासकीय पायाभूत सुविधेला प्राधान्य देते की बिल्डरलॉबीच्या कॉम्लॅक्स धोरणाला याची चर्चा मनपात चालू आहे़ त्याचबरोबर या भागातील नागरिकांनीही जिल्हाधिकार्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले आहे़ विवेकानंद चौकात व्यापारी संकुल उभारणी संदर्भात मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याशी सायं़ ७़३० वाजण्याच्या सुमारास संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ असल्याचे सांगत होता़ जिल्हाधिकार्यांना पोलिस अधीक्षकांचे पत्र ४ मार्च २०१४ रोजी राज्य शासनाच्या गृहविभागाने लातूर शहरातील विवेकानंद चौकात नवीन पोलिस ठाणे निर्मितीसाठी मंजुरी दिली आहे़ त्यानुसार या पोलिस ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, चार पोलिस उपनिरिक्षक व ७३ पोलिस कर्मचार्यांची नव्याने मंजूरी देण्यात आली आहे़ पोलिस स्टेशन गांधी चौक व लातूर ग्रामीणच्या परिसरातील अस्तित्वात असलेली गावे व प्रभाग यांचे विभाजन करून नवीन विवेकानंद चौक पोलिस ठाणे उभारण्यात येत आहे़ शासन निर्णयाप्रमाणे नवनिर्मित पोलिस ठाणे त्वरीत कार्यान्वित करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या अखत्यारितील विवेकानंद चौक परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळची मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रभारी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी केली आहे़ सदरील जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही पोलिस प्रशासनाने केली आहे़