चुकीच्या पत्त्याने घेतली ‘परीक्षा’
By Admin | Updated: December 28, 2015 00:24 IST2015-12-27T23:49:31+5:302015-12-28T00:24:55+5:30
औरंगाबाद : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा देण्यासाठी आलेले शेकडो विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशपत्रावरील चुकीच्या पत्त्यामुळे रविवारी मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

चुकीच्या पत्त्याने घेतली ‘परीक्षा’
औरंगाबाद : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा देण्यासाठी आलेले शेकडो विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशपत्रावरील चुकीच्या पत्त्यामुळे रविवारी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. चुकीच्या पत्त्यामुळे केंद्राची शोधाशोध करताना त्यांचा गोंधळ उडाला. दोन-तीन तास शोधाशोध करून अनेकांनी परीक्षा केंद्र गाठले; परंतु अशा परिस्थितीत विलंब झाल्याने अनेकांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या नेट परीक्षेसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच लगतच्या नगर, जळगाव, बुलडाणा या जिल्ह्यांतून परीक्षार्थी व पालक आले होते. रेल्वेस्थानक, बसस्थानकावरून आॅटोरिक्षा करून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी निघाले; परंतु प्रवेशपत्रांवरील चुकीच्या पत्त्यांमुळे त्यांची धांदल उडाली. दोन ते तीन तास परीक्षा केंद्र शोधण्याची वेळ आली. त्यातच वेळ गेल्याने परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. अर्धवट पत्त्यामुळे परीक्षार्थीचे हाल झाले. अनेक दिवसांपासून तयारी करूनही परीक्षा देता आली नाही. त्यामुळे परीक्षेची पूर्ण तयारी करून आलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर होता. पत्ता विचारत परीक्षा केंद्रावर पोहोचलो. मात्र, वेळ झाल्याने परीक्षेला मुकावे लागले. प्रवेशपत्रांवर चुकीचा पत्ता टाकण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
तीन तास शोधाशोध
देवळाई तांडा येथील स्कॉलर्स व्हॅली स्कूल या सेंटरवरील परीक्षार्थींना चुकीच्या पत्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. प्रवेशपत्रावर देवळाई, सातारा परिसर असे नमूद करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात हे केंद्र देवळाई तांडा येथे होते. अनेकांनी संपूर्ण सातारा परिसर बघितला. त्यात वेळ गेला. सकाळी साडेनऊ वाजता पहिला पेपर होता. त्यामुळे किमान नऊ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक होते; परंतु हॉलतिकिटावरील पत्ता शोधताना परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांची पळापळ झाली. दोन-तीन तास शोधाशोध केल्यानंतर परीक्षार्थींना पत्ता सापडला. चुकीचा पत्ता असतानाही परीक्षार्थींनी केंद्राचा पत्ता शोधून काढला; परंतु काहींना केंद्रापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला. सकाळी ९.३५ वाजता पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी गेट बंद करण्यात आले. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. चुकीच्या पत्त्यामुळे झालेल्या मनस्तापाविषयी विद्यार्थ्यांनी ‘यूजीसी’कडे तक्रार केली आहे. रेल्वेने शहरात आल्यावर रिक्षा केली; परंतु चुकीच्या पत्त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दोन तास शोधाशोध करावी लागली. रिक्षाला २०० रुपये मोजावे लागले. सेंटर परिसरात साधी खाद्यपदार्थांचीही सोय नव्हती. असे नांदेड येथून आलेले परीक्षार्थीचे भाऊ नवीद पठाण यांनी सांगितले.