पाण्याच्या शुद्धतेची कसोटी
By Admin | Updated: July 12, 2014 01:03 IST2014-07-12T01:03:28+5:302014-07-12T01:03:28+5:30
अशोक कारके, औरंगाबाद शहरातील १३ लाख लोकसंख्येला पुरवठा केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता कोणत्याही कसोटीवर खरी उतरण्याची शक्यता नाही.
पाण्याच्या शुद्धतेची कसोटी
अशोक कारके, औरंगाबाद
शहरातील १३ लाख लोकसंख्येला पुरवठा केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता कोणत्याही कसोटीवर खरी उतरण्याची शक्यता नाही. कारण मनपा, पाटबंधारे व आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत पाण्याच्या ६५ चाचण्या करून अहवाल देण्याची व्यवस्थाच नाही. काही मोजक्या चाचण्या शहरातील प्रयोगशाळांमध्ये केल्या जातात.
नाल्याचे पाणी टँकरद्वारे नागरिकांना विकण्याचे प्रकरण लोकमतने चव्हाट्यावर आणले. खाजगी टँकरचे पाणी कुणी तपासून द्यावे, याबाबत अजून तरी कोणतीही यंत्रणा पुढे आलेली नाही. त्यामुळे खाजगी टँकरने पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मनपाकडून शहरात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे टीडीएस वाढते. त्यामुळे त्याच्या शुद्धतेवरही प्रश्न निर्माण होत आहे. असे असले तरी पालिका मात्र, शुद्ध पाणीपुरवठा करीत असल्याचा दावा करते.
नागरिक पिण्यासाठी खाजगी टँकरचे पाणी विकत घेतात. ते टँकरचालक कुठून पाणी आणतात, ते शुद्ध आहे का, हे तपासण्याची जबाबदारी मनपा, एफडीए, प्रयोगशाळा, जलगुणवत्ता प्रयोगशाळा यांच्यापैकी कुणीही घेण्यास तयार नाही. शहरात पाण्याची गुणवत्ता दोन प्रयोगशाळेत तपासली जाते. त्यात पाटबंधारे विभागाची जलगुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा स्तर क्र. २, तर दुसरी छावणी निजाम बंगला येथे आरोग्य विभागाची पाणी तपासणी प्रयोगशाळा आहे.
या दोन्ही प्रयोगशाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी (कर:10500) प्रमानकानुसार ६५ तपासण्या करण्याची व्यवस्था नाही. वरील मानकाप्रमाणे फिजिकल- ६, जनरल- २४, टॉझिक- १२, रेडिओअॅक्टिव्ह- २, पेस्टिर्साड १८, बॅक्टरीओलॉजिक्ल- ३, अशा ६५ तपासण्या करणे गरजेचे आहे. यापैकी फक्त २० तपासण्या जलगुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा स्तर क्र. २ मध्ये, तर आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत १० तपासण्या केल्या जातात. यामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा शुद्ध होतो का असा प्रश्न समोर उभा आहे.
या २० तपासण्या होतात
कलर, ओडर, पी. एच., डिझॉल्व्ह सॉलिडस्, टर्बिडिटी,अल्कलीनिटी, क्लोराईडस्, सल्फाटेस, कॅल्शिअम, टोटल हार्डनेस, बोरॉन, नाईट्रेट, अल्युमिनिअम, आयर्न, मॅग्नेन्स, टोटल कोलिफॉरम्स- फिक्ल कोलिफॉरम्स, रेसिड्युल, फ्री क्लोरिन, मॅग्नेशिअम, ई-कोली या तपासण्या जलगुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा स्तर क्र. २ मध्ये केल्या जातात.
आवश्यक तपासण्या करतो
शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक पाण्याच्या तपासण्या केल्या जात आहेत; तसेच दर तीन महिन्याला टॉझिकची तपासणी केली जाते, असे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले.