दीड ‘दमडी’च्या रस्त्यासाठी एक तप
By Admin | Updated: January 20, 2015 01:27 IST2015-01-20T01:15:19+5:302015-01-20T01:27:40+5:30
औरंगाबाद : पंचायत समिती कार्यालय, दमडी महलमार्गे चंपाचौकापर्यंत नवीन रस्ता तयार करण्याचा निर्णय महापालिकेने दहा वर्षांपूर्वी घेतला.

दीड ‘दमडी’च्या रस्त्यासाठी एक तप
औरंगाबाद : पंचायत समिती कार्यालय, दमडी महलमार्गे चंपाचौकापर्यंत नवीन रस्ता तयार करण्याचा निर्णय महापालिकेने दहा वर्षांपूर्वी घेतला. दीड ‘दमडी’च्या कामासाठी एक तप झाले तरी अजून काम प्राथमिक स्तरावरच आहे. मनपाच्या या दिरंगाईमुळे सर्वसामान्य औरंगाबादकरांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
एस. टी. कॉलनी, फाजलपुऱ्याजवळील हजरत पीर गैबसाहब दर्ग्याच्या बाजूने नाल्यावर एक पूल उभारून रस्ता तयार केल्यास लाखो वाहनधारकांना फायदा होईल. म्हणून रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. दहा वर्षांपूर्वी हे काम एका नगरसेवकाने घेतले. त्याने नाल्यात पूल उभारण्यासाठी कॉलम उभे केले. या कामावर १८ लाख रुपये खर्च झाले होते. कंत्राटदाराने पैसेही उचलले आणि काम करण्यास नकार दिला. त्यानंतर मनपाने जालना येथील एक ठेकेदार शोधून आणला. त्याला नाल्यात पूल उभारण्याचा बराच अनुभव असल्याचे सांगण्यात आले. या कंत्राटदाराने जेव्हापासून काम हाती घेतले तेव्हापासून एक वीटही नवीन उभारलेली नाही. नवीन कंत्राटदाराला दीड कोटींमध्ये पूल, रस्ता बांधून द्यावयाचा आहे.
पंचायत समितीच्या बाजूला कृषी विभागाचे कार्यालय आहे. हे कार्यालय पुलाच्या रस्त्यात जात आहे. या कार्यालयाने मनपाकडे पर्यायी जागेची मागणी केली. मनपाने त्यांना पर्यायी जागाही दिली. आता कृषी कार्यालय स्वतंत्र इमारत बांधून देण्याची मागणी करीत आहे. तूर्त मनपाने कृषी कार्यालय स्थलांतरित करून जागेचा ताबा घेतला.