दहा तलाव कोरडेठाक
By Admin | Updated: July 4, 2014 00:16 IST2014-07-03T23:32:03+5:302014-07-04T00:16:30+5:30
तामलवाडी : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तुळजापूर तालुक्यातील पाण्याने तळ गाठला आहे.

दहा तलाव कोरडेठाक
तामलवाडी : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तुळजापूर तालुक्यातील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरीचा पाणीसाठा कमी झाल्याने व पाऊसही नसल्याने नगदी समजले जाणारे उसाचे पीक वाळून जाऊ लागले असून, सद्यस्थितीत तामलवाडी परिसरातील दहा साठवण तलावही कोरडेठाक पडले आहेत.
मृगात पाऊस होऊन खरिपाची पेरणी होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण केली. मात्र, दीड महिन्यापासून पाऊस झाला नाही. कडक उन्हामुळे तलावातील उपलब्ध पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. त्यात सांगवी, माळुंब्रा, सावरगाव, धोत्री, केमवाडी, काटी, दहिवडी, कदमवाडी या साठवण तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. वाफेबांधणी करून ठेवलेला ऊसही पाण्याअभावी जागेवर वाळून जात आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा पाणीसाठा कमी झाला असून, परिसरातील अनेक गावांत आता टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. पावसाअभावी परिसरात अद्याप एक टक्काही खरिपाची पेरणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
जलस्त्रोत अधिग्रहणाचे सोळा प्रस्ताव दाखल
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यात दिवसेंदिवस टंचाईची तीव्रता वाढत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील विविध गावांतून जलस्त्रोत अधिग्रहणासाठी १६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले असून, यातील सात प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यात उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाई जाणवली नसली तरी पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटत असताना अद्याप पाऊस झाला नसल्याने जून-जुलैमध्ये टंचाईची परिस्थिती गंभीर बनल्याचे दिसत आहे. सध्या सुरतगाव, यमगरवाडी, हगलूर, येडोळा, वडाचा तांडा, कोरेवाडी, किलज येथे विंधन विहिरींचे अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय बसवंतवाडी, जळकोटवाडी (नळ), मर्टा आणि शिराढोण येथून प्रस्ताव दाखल झाले आहे. पंचायत समिती प्रशासनाकडे अद्याप टँकरची मागणी आली नसली तरी यापुढील काळात जेथून मागणी येथील तेथे तातडीने टँकर मंजूर करण्यात येणार असल्याचे उपसभापती प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.
ऊस करपू लागला
तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात सध्या पाण्याअभावी ऊस करपत असल्याचे दिसत आहे. अणदूर परिसरात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे. मार्च ते मे महिन्यापर्यंत बोरी धरणातून पाणी सोडल्याने सुरूवातीला उसाचा पाणीप्रश्न निर्माण झाला नाही. मात्र, अद्याप पाऊस झाला नसल्याने व विहिरीतील पाणी पातळीने तळ गाठल्याने हातातोंडाशी आलेले पीक करपत असल्यचे दिसत आहे. याशिवाय पावसाला विलंब झाल्याने तालुक्यातील खरिपातील उडीद, मूग या पिकांचे अस्तित्वही धोक्यात आले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
बंदी असतानाही कडबा विक्री
जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याबाहेर चारा विक्रीस प्रतिबंध केला आहे. असे असतानाही या भागातून राजरोसपणे चारा विक्रीसाठी बाहेर जातअ सल्याचे दिसत आहे. पाऊस असाच लांबत राहिल्यास या भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.