टेम्पो नदीत कोसळला, 3 ठार तर २३ भाविक जखमी
By Admin | Updated: July 21, 2016 01:19 IST2016-07-21T00:03:50+5:302016-07-21T01:19:23+5:30
फुलंब्री : सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे येणारा टेम्पो पाथ्रीनजीकच्या पुलावरून गिरिजा नदीपात्रात कोसळून तीन जण ठार तर २३ भाविक जखमी झाले.

टेम्पो नदीत कोसळला, 3 ठार तर २३ भाविक जखमी
फुलंब्री : सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे येणारा टेम्पो पाथ्रीनजीकच्या पुलावरून गिरिजा नदीपात्रात कोसळून तीन जण ठार तर २३ भाविक जखमी झाले. बुधवारी (दि.२०) दुपारी २ वाजेदरम्यान ही घटना घडली. आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन तात्काळ मदत केल्याने अनेकांचे प्राण वाचले. मृतांमध्ये कोंडीराम रामभाऊ सुरोसे (५५), नानासाहेब यादवराव काळे (६८) व लक्ष्मण बाजीराव केतके (७५, सर्व रा. विजयपूर, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे.
विजयपूर (तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर) येथील टेम्पोमध्ये (क्र. एमएच-०४ सीए-१७५७) २६ भाविक आणि अन्य एका क्रुझर जीपमधून १२ भाविक मंगळवारी सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील अंबऋषी देवस्थानाच्या दर्शनासाठी आले होते. बुधवारी ते दर्शन करून परतत असताना जीपमधील भाविक चहा पिण्याकरिता मागे थांबले व टेम्पो पुढे निघाला. हा भरधाव टेम्पो पाथ्री येथील पुलाचे कठडे तोडून उजव्या बाजूने गिरिजा नदीत कोसळला. या टेम्पोमधील २६ जण टेम्पोसह पाण्यात कोसळले. यातील दोघे जागीच ठार झाले, एकाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींना प्रथम फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मृत दोघांचे पार्थिव फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
अपघातातील जखमींवर घाटीत उपचार करण्यात आले.
संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी केली जखमींची विचारपूस
सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे येणारा टेम्पो पाथ्रीनजीकच्या पुलावरून गिरिजा नदीच्या पात्रात कोसळून तीन जण ठार व २३ जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच संवेदनशील जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. जखमींच्या उपचारात कसूर राहू नये, यासाठी सुमारे तासभर त्या घाटी रुग्णालयात ठाण मांडून होत्या.
अपघातामधील जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी घाटीतील कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिकांनीही मदत करून रुग्णांना वॉर्डात हलवणे, त्यांचे एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जाणे, यासाठी पुढाकार घेतला.
माहिती मिळताच जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
यावेळी घाटीचे वैद्यकीय अधीक्षक सुहास जेवळीकर, अप्पर तहसीलदार विजय राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला बनकर, पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलीस आयुक्त रविकांत बुवा, पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांची उपस्थिती होती.
अवैध वाहतुकीला आळा घालणार - जिल्हाधिकारी
‘लोकमत’शी बोलताना जिल्हाधिकारी निधी पांडे म्हणाल्या की, जखमींपैकी अनेक महिलांना मानसिक धक्का बसलेला आहे. त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचे निर्देश आपण डॉक्टर्स आणि नर्सेस यांना दिले आहेत. ज्याठिकाणी अपघात झाला त्या पुलाला कठडे नसल्याचे समजले. अशा प्रकारे कठडे नसलेल्या पुलांचा आढावा घेण्यात येईल. अपघातग्रस्त सर्व भाविक मालवाहू टेम्पोने प्रवास करीत होते. अवैध प्रवासी वाहतूकही या घटनेला जबाबदार आहे. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी गुरुवारी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक बोलविली आहे.
पुलाचा कठडा तुटल्याने झाला अपघात
वडोदबाजार : औरंगाबाद- जळगाव राज्य मार्गावरील पाथ्रीगावानजीक गिरिजा नदीच्या नव्यानेच झालेल्या पुलाचा कठडा तुटल्याने टेम्पो सरळ शंभर फूट खोलवर असलेल्या नदीपात्रात जाऊन कोसळल्याने अपघात घडला.
गत सहा महिन्यांपूर्वीच सदर पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. अवघ्या सहा महिन्यांतच या पुलावरील डांबर जाऊन रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने सा.बां. विभागाचे पितळ उघडे पडले. नेमका हाच खड्डा वाचविण्याच्या नादात वाहनचालकाने ब्रेक लावल्याने की, वाहनास झालेल्या अन्य बिघाडामुळे चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पुलाचे कठडे तोडून सरळ नदीपात्रात जाऊन कोसळला असावा.
विशेष म्हणजे गिरिजा नदीवर जुना व नवा, असे दोन पूल असून या ठिकाणी वनवेप्रमाणे वाहने जातात; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलाही फलक अथवा दिशा दर्शविलेली नाही.
रस्त्यावरील काही ठिकाणचे डांबर उखडल्याने वाहने खड्ड्यात आदळत आहेत, तर जुन्या व नव्या पुलामध्ये जवळपास तीस-चाळीस फुटांचे अंतर असल्याने सा.बां. विभागाने सुटलेल्या जागेत भिंत अथवा कठडे बांधण्याची तसदी घेतलेली नाही. सदर पुलाचे कठडे मजबूत असते, तर कदाचित आजची दुर्घटना टळली असती.
अन् नागरिक मदतीला धावले
टेम्पो नदीच्या पात्रात कोसळताच त्या वाहनाच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या ताफ्यातील अन्य वाहनांमुळे टेम्पोची ओळख त्वरित पटली; परंतु नदीपात्रात पाणी जास्त असल्याने टेम्पोतील सर्व प्रवासी पाण्याखाली झाकले गेले. नदीत जवळपास दीड परस पाणी होते; परंतु आसपासचे लोक व वाटसरूंनी तात्काळ घटनास्थळी थांबून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले. अनेकांनी थेट नदीत उड्या घेऊन अडकलेल्यांना बाहेर काढण्यास मदत केली. घटनास्थळी अपघातग्रस्तांचाआक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. एका पलंगावरून जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात येत होते. टेम्पोत लहान मुलांसह एकूण २८ महिला व पुरुष होते.
सरकारी यंत्रणा पोहोचण्याअगोदरच नागरिकांची अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळाल्याने अनेकांचा जीव वाचला. अंकुश ताठे, रफिक बेग, मनोज चिकटे, चंद्रकांत श्ािंदे, ज्ञानेश्वर ताठे, मुक्तार शहा, अरुण ठाकरे, रवींद्र सोनवने, मयूर आठवले, फे रोज शेख, राजू शहा, सलमान शहा आदींसह पाथ्री व परिसरातील नागरिकांनी बचावकार्य केले.
अपघात घडून दोन तास उलटले तरी घटनास्थळी सरकारी यंत्रणेचे बचाव पथक पोहोचले नव्हते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी परिसरातील खाजगी व सरकारी रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पाण्याबाहेर काढलेल्या जखमींना एकेक करून रुग्णालयात पाठवण्यात येत होते.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक जाम झाली होती. वडोदबाजार पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
मदतीसाठी झटले अनेक जण
औरंगाबाद : पुलावरून नदीत कोसळलेल्या टेम्पोतील जखमींना उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल करण्यासाठी बुधवारी अनेकांचे हात झटले. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलविण्यासाठी रुग्णवाहिका चालक, घाटीचे अधिकारी- कर्मचाऱ्यांसह अनेक युवकांनी धावाधाव केली.
अपघातात अनेक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना घाटीत दाखल केले जात आहे, हे समजताच अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के, डॉ. सुहास जेवळीकर यांच्यासह अनेकांनी अपघात विभागात धाव घेतली. एक-एक रुग्णवाहिका जखमींना घेऊन येत होती.
क्षणाचाही विलंब न करता सर्व जखमींना विशेष वॉर्डात दाखल करण्यात आले. या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी जखमींवर तात्काळ उपचार सुरू केले. जवळपास ७ रुग्णवाहिकांमधून जखमींना या ठिकाणी दाखल करण्यात आले. के.के.ग्रुपचे हाफीस साहब ऊर्फ अखिल अहेमद, किशोर वाघमारे, जुनेद खान, काजी शारेख, अक्षय दांडगे यांच्यासह जवळपास २० युवकांनी जखमींना वॉर्डात दाखल करण्यासाठी परिश्रम घेतले. जखमींना घटनास्थळाहून घाटीत आणण्यासाठी चाचू अॅम्ब्युलन्स ग्रुपने मदत केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
डोळ्यादेखत पडला टेम्पो
टेम्पोच्या पाठीमागे आमची जीप होती. अवघ्या काही अंतरावर असलेला टेम्पो आमच्या डोळ्यादेखत पुलावरून खाली पडला. त्यामुळे मदतीसाठी आम्ही तात्काळ धाव घेतली. सुदैवाने टेम्पो कडेला पडला, असे भारत जगदाळे म्हणाले.
...आणि सायरन वाजला
अपघात विभागाच्या इमारतीवर सायरन बसविण्यात आलेला आहे. एखादी मोठी घटना असल्यावरच हा सायरन सुरू केला जातो. अनेक दिवसांनंतर बुधवारी हा सायरन वाजला. कोणाकडून बोलावणे आलेले नसतानाही अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली.
नातेवाईकांची घाटीत धाव
टेम्पोचा अपघात झाल्याची माहिती मिळताच जखमींच्या औरंगाबादमधील नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. तसेच जखमींच्या गावातूनही अनेक जण गाड्या करून घाटीत आले.
रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी घाटी प्रशासनाने केसपेपर जागेवरच उपलब्ध करून दिले.
२५ डॉक्टरांचे पथक
उपचारासाठी २५ डॉक्टरांचे पथक होते. अन्य कर्मचारीही होते. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रत्येक विभागाचे विभागप्रमुखदेखील हजर होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी हजर होते.
अपघातातील जखमींवर घाटीत उपचार
घाटीत दाखल करण्यात आलेल्या जखमींमध्ये गंगाधर विश्वनाथ जगदाळे (वय ५५), कौशल्या सुदाम जगदाळे (६०) , चंद्रा भुजंगराव जगदाळे (६५), गंगाधर विश्वनाथ सुरासे (६५), छाया भाऊसाहेब जगदाळे (३५), उषा बाजीराव सुरासे (४०), कांताबाई भरत जगदाळे (४०), शारदा जगदाळे (४५), विद्या नानासाहेब काळे (५५), बाजीराव विश्वनाथ सुरवसे (४५), सोपान गणू पवार (५५),राहिबाई (६५), कल्याणी (१३), गयाबाई (६५), सुलभा सुरासे, सोनाली (११), चाहुबाई (६०), विठ्ठल भुसे (५५), पार्वतीबाई (६०), हरिभाऊ पवार (५०), विजेंद्र (५०), गयाबाई वाघमारे (५५),जनाबाई भारत जगदाळे (३५, सर्व राहणार विजयपूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर) यांचा समावेश आहे.
दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा
४अपघातानंतर शेकडो लोक आपली वाहने उभी करून थांबले होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यातील अनेक जण आपल्या मोबाईलवर अपघाताचे चित्र व व्हिडिओ शूटिंग काढण्यात गुंतले होते, तर अनेक जण बघ्याच्या भूमिकेत उभे होते.
पोलिसांना झाला विलंब
पाथ्री पुलापासून वडोदबाजार पोलीस ठाणे केवळ पाच कि.मी. अंतरावर आहे. अपघात घडला २ वाजता. पोलिसांना या घटनेची माहिती त्वरित देण्यात आली; पण २.४५ वाजता एक अधिकारी व तीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत लोकांनी जखमींना घाटी रुग्णालयात पाठविले होते. येथे आल्यावर पोलिसांनी केवळ बघ्यांना बाजूला सरकविण्याचेच काम केले.
मदतकार्य जोरात
४अपघातानंतर नजीकच्या शेतातील शेतकरी व रस्त्यावरील प्रवाशांनी धाव घेतली. पाण्यात बुडत असलेल्या महिला व पुरुषांना तात्काळ बाहेर काढले. तसेच जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविले. चालू न शकणाऱ्या जखमी व मृतदेहांना पलंगावर ठेवून वर आणण्यात आले.
४या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. तात्काळ मदत झाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. शिवाय सरकारी व खाजगी रुग्णवाहिकासुद्धा त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या.