टेम्पोची कारला धडक; पिता-पुत्र जागीच ठार
By Admin | Updated: May 17, 2014 01:14 IST2014-05-17T00:58:56+5:302014-05-17T01:14:25+5:30
वैजापूर : भरधाव जाणार्या टेम्पोने मारुती कारला जोराची धडक दिल्याने एका दीडवर्षीय चिमुकल्यासह त्याच्या पित्याचा जागीच मृत्यू, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

टेम्पोची कारला धडक; पिता-पुत्र जागीच ठार
वैजापूर : भरधाव जाणार्या टेम्पोने मारुती कारला जोराची धडक दिल्याने एका दीडवर्षीय चिमुकल्यासह त्याच्या पित्याचा जागीच मृत्यू, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजेच्या सुमारास वैजापूर-औरंगाबाद महामार्गावरील जरू ळ फाट्यावर घडली. या प्रकरणी टेम्पो चालकास अटक करण्यात आली आहे. अनिल किशन राठोड (२९) व कार्तिक अनिल राठोड (दीड वर्ष), रा. धानोरा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा असे अपघातातील मृतांची नावे आहेत. अनिल राठोड हे त्यांची पत्नी वंदना, मुलगा कार्तिक व भाऊ सतीश राठोड यांच्यासह मारुती कारमधून (क्र. एमएच-०४-एएच-३८९९) मुंबई येथून बुलढाण्याकडे जात होते. त्याचवेळी समोरून औरंगाबादच्या दिशेने येणार्या टेम्पोने (क्र. एमएच-११-टी-७११) कारला जोरदार धडक दिल्याने अनिल राठोड व कार्तिक जागीच ठार झाले. सतीश व वंदना राठोड हे दोघेजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा बिरारी, हवालदार नारायण कटकुरी, पोलीस नाईक बाबासाहेब धनुरे, पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ कणसे व इरफान शेख आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांसह जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. हा अपघात एवढा भीषण होता की, टेम्पोच्या धडकेने कारचा चेंदामेंदा होऊन मृतदेह त्यात फसले गेले. दरम्यान, या प्रकरणी सतीश राठोड, रा. धानोरा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालक मनोज दिलीप झिने (२५), रा. मालगणी, ता. चिखली, जि. बुलढाणा याच्याविरुद्ध वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली. कपडे धुण्यासाठी गेलेली विवाहिता बेपत्ता जांबरगाव येथील कविता पोपट साठे (२५) ही विवाहिता दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. १३ मे रोजी दुपारी बारा वाजता नातेवाईकाच्या शेतात कपडे धुण्यासाठी जाते म्हणून ती घराबाहेर गेली; मात्र अद्याप घरी परतली नाही, अशी तक्रार तिचा भाऊ दादासाहेब शिंदे यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार वैजापूर पोलीस ठाण्यात तिच्या हरवल्याची नोंद करण्यात आली असून हवालदार नंदकुमार नरोटे व दीपक सुरासे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, सदर वर्णनाच्या महिलेबाबत कुणाला माहिती असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वैजापूर पोलिसांनी केले आहे.