अश्रू... हुंदके आणि आक्र ोश
By Admin | Updated: June 4, 2014 01:30 IST2014-06-04T00:37:54+5:302014-06-04T01:30:32+5:30
प्रताप नलावडे , बीड मी जिल्ह्याचा आणि जिल्हा माझा, अशी हृदयस्पर्शी हाक देणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे आज येणार होते, आपल्या लोकांना भेटण्यासाठी

अश्रू... हुंदके आणि आक्र ोश
प्रताप नलावडे , बीड मी जिल्ह्याचा आणि जिल्हा माझा, अशी हृदयस्पर्शी हाक देणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे आज येणार होते, आपल्या लोकांना भेटण्यासाठी.परंतु आज सकाळी आली त्यांच्या निधनाची बातमी. संपूर्ण बीड जिल्ह्याला धक्का देणारे हे वृत्त होते. निधनाचे वृत्त अनाहुतपणे समजल्यावर लोकांच्या अश्रुंचा बांध फुटला. लोक धायमोकलून रस्त्यावर उभे राहून रडत होते. संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली होती. मंगळवारी दिवसभर अनेक गावांमध्ये चुलीही पेटल्या नाहीत. बीडसह जिल्ह्यातील सर्वच शहरात व्यापार्यांनी आपले व्यवहार बंद ठेऊन आपल्या लाडक्या नेत्यास श्रध्दांजली वाहिली. मुंडे यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यातील लोकांना खूप मोठा धक्का बसला असल्याचेच दिसत होते. सकाळी नऊ वाजता शहरभर हे वृत्त पसरले आणि व्यापार्यांनी तात्काळ आपली दुकाने बंद केली. शहरात ठिकठिकाणी श्रध्दांजली अर्पण करणारे फलक लावण्यात आले. केंद्रीय मंत्रीमंडळात सामावेश झाल्यानंतर परळी येथे त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन वाजता ते नारायणगडावर जाणार होते आणि तेथून ते परळीला जाणार होते. बीड शहरासह जिल्ह्यात सर्वत्र त्यांच्या स्वागताचे फलक आणि कमानी उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही दोन दिवसांपासून कमालीचा उत्साह होता. हे वृत्त समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र लावण्यात आलेले स्वागताचे फलक उतरवण्यात आले आणि त्याठिकाणी लोकांनी जड अंत:करणाने श्रध्दांजलीचे फलक लावले. स्वागताच्या फलकाऐवजी श्रध्दांजलीचे फलक लावण्याची दुर्दैवी वेळ कार्यकर्त्यांवर आली. शिवाजीनगर परिसरात भाजपाचे जिल्हा कार्र्यालय आहे. निधनाचे वृत्त समजल्यानंतर कार्यालयासमोर लोकांची गर्दी झाली होती. महिलांची गर्दीही लक्षणीय होती. लोकांनी हबंरडा फोडला होता. एकमेकांच्या गळ्यात पडून लोक साहेब, आम्हाला सोडून गेले, असे म्हणत आक्रोश करत होते. महिलांनाही आपले अश्रू अनावर झाल्याचेच दिसत होते. बीडमध्ये आले की मुंडे भाजपा कार्यालयात हमखास यायचे. याचठिकाणी ते पत्रकारांशी संवादही साधत असत. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर याच कार्यालयात त्यांची शेवटची पत्रकार परिषद झाली होती. यावेळी त्यांच्या चेहर्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत होता. एका प्रश्नाला उत्तर देताना मुंडे म्हणाले होते, निवडणुकीत काय झाले, हे आता मला उगळत बसायचे नाही. विसरून जाणे हा आपला गुणधर्म आहे. याचवेळी त्यांनी आपण आजपासूनच विधानसभेच्या कामाला लागलो असल्याचेही अगदी आत्मविश्वासाने सांगितले होते.निकालानंतर मुंडे बीडहून गेले ते पुन्हा परतलेच नाहीत. ग्रामीण भागातही लोक अक्षरश: शेतातही गेले नाहीत. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन आपल्या लाडक्या नेत्याच्या फोटोला पुष्पहार घालून आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या वाढदिवसाचे फलकही शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. यावर गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र होते. सकाळी शहरातील सर्व फलक उतरविण्यात आले आणि सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले. बीड शहरात संपूर्ण रस्त्यावर आज दिवसभर सन्नाटा पसरल्याचे दिसत होते. गटागटाने लोक एकत्र जमले असल्याचे दिसत होते. अनेक ठिकाणी टीव्ही समोर लोक बसून होते. साहेब, तुम्ही सोडून का गेलात? भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची वार्ता मंगळवारी सकाळी आठ वाजता जिल्ह्यात येऊन धडकली़ त्यानंतर मुंडे यांच्या चाहत्यांना धक्काच बसला़ कोणाचाही विश्वास बसत नव्हता; पण झाले ते सत्य होते़ अश्रू अन् हुंदक्यांनी जिल्हा अक्षरश: सुन्न झाला़ अर्ध्या जिल्ह्यात चूल देखील पेटली नाही़ ‘साहेब, तुम्ही आम्हाला सोडून का गेलात? तुम्ही आज हवे होता़़़’ असे हृदय पिळवटून टाकणारे संवाद गल्लोगल्लीतून ऐकावयास मिळत होते़ बीड, परळी, शिरुर, माजलगाव या भागात गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा मोठा समूह आहे़ या भागात तर सकाळपासून चूलही पेटली नाही़ प्रत्येक जण साहेबांच्या आठवणीत गर्क झाला होता़ शहरांमध्येच नाही तर खेड्यांतही मुंडेंवर प्रेम करणारे लोक अश्रू ढाळताना दिसून आले़ अनेकांनी निधनाची वार्ता ऐकून बीडकडे धाव घेतली़ काही परळीला तर काही मुंबईला गेले़ दिवसभर ते अन्नपाण्यावाचून होते़ विशेष म्हणजे सर्वसाधारण कार्यकर्त्यांपासून ते विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्र्त्यांनीही गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला़ भाजपा कार्यकर्ते एकमेकांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत होते़ त्यामुळे अनेक गावांमधील वातावरण सुन्न झाले होते़ केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे पार्थिव बुधवारी सकाळी ७ वाजता परळीत आणण्यात येणार आहे. मुंबईहून विमानाने पार्थिव लातूरला आणण्यात येईल. त्यानंतर हेलिकॉप्टरने पार्थिव परळीत आणले जाईल. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराची मंगळवारी रात्रीपासूनच तयारी सुरू झाली आहे. मुंडे यांनी उभ्या केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी मंगळवारी दिवसभर सन्नाटा होता. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला. त्यांचे ज्येष्ठ बंधू पंडितराव मुंडे हे देखील दुपारी यशश्रीवर पोहोचले. ते तेथेच तळ ठोकून होते. मुंडे यांना तीन मुली आहेत. त्यापैकी दोघी विवाहित आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाला कोण अग्निडाग देणार हे कुटुंबियांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या मुलींपैकी एकजण अग्निडाग देण्याचे कर्तव्य पार पाडेल, अशी माहिती आहे. मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी परळीत कडेकोट बंदोबस्त आहे. पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी हे तळ ठोकून आहेत. तीन अप्पर अधीक्षक, वीस उपअधीक्षक, ३५ निरीक्षक व दोन हजारांवर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अंत्यसंस्कारासाठी केंद्रातील डझनभर मंत्री येणार आहेत. भाजपा नेते राजनाथसिंह, लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, नितीन गडकरी यांचा समावेश आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते देखील अंत्यदर्शनासाठी हजेरी लावतील. परळीत मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी येणार्या व्हीआयपींची संख्या पाहता पंधरा ठिकाणी हेलीपॅडची व्यवस्था केली आहे. कारखाना परिसरात हेलीपॅड तयार करण्यात आले आहेत. हेलीपॅड बनविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गोपीनाथराव मुंडे यांचे नाथ्रा हे जन्मगाव शोकसागरात बुडाले. येथे मंगळवारी दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. आबालवृद्धांसह महिलांनाही अश्रू लपविता आले नाहीत. मुंडे यांचे निवासस्थान बंद होते. अनेकांनी त्यांच्या परळीतील निवासस्थानी धाव घेतली.