शिकवणी पॅटर्नची विद्यार्थ्यांवर मोहिनी !

By Admin | Updated: July 11, 2014 00:58 IST2014-07-11T00:00:28+5:302014-07-11T00:58:55+5:30

चेतन धनुरे , लातूर अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत लातूर हे येथील बाजारपेठेमुळे प्रसिद्ध होते. एव्हाना आताही ते आहेच. परंतु, अलिकडच्या काही वर्षांत लातूर राज्यभरात नावारुपास आले

Teaching Pattern students siren! | शिकवणी पॅटर्नची विद्यार्थ्यांवर मोहिनी !

शिकवणी पॅटर्नची विद्यार्थ्यांवर मोहिनी !

चेतन धनुरे , लातूर
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत लातूर हे येथील बाजारपेठेमुळे प्रसिद्ध होते. एव्हाना आताही ते आहेच. परंतु, अलिकडच्या काही वर्षांत लातूर राज्यभरात नावारुपास आले ते शिक्षणाच्या ‘लातूर पॅटर्न’मुळे. मात्र आता हा पॅटर्नही झाकोळला जात आहे शिकवण्यांच्या पॅटर्नखाली. लातुरातील बंद पडलेल्या कारखान्यांत शिकवण्यांचे उद्योग सध्या जोमाने सुरू आहेत. या बिनभांडवली धंद्याची उलाढालही अगदी ८० कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. त्यातूनच शुल्क व विद्यार्थी संख्या लपविण्याचे प्रकार काही खाजगी क्लासेसकडून सुरू झाले आहेत.
अकरावी, बारावी अभ्यासक्रमातील लातूर पॅटर्नची ख्याती राज्यभर पसरल्यानंतर येथील महाविद्यालयांत प्रवेशासाठी प्रचंड ओघ सुरू झाला. प्रवेशाच्या या स्पर्धेतून बाद होणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा दूर करण्याचे एक नवे तंत्र येथील प्राध्यापकांना गवसले. प्रारंभीच्या काळात नामांकित महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी नोकरी सोडून लातूर पॅटर्नचा आधार घेत शिकवण्यांची बाजारपेठ बहरविण्यास सुरुवात केली. ज्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळाला नाही, त्यांना गळी उतरवून इतर महाविद्यालयांत नाममात्र प्रवेश देत शिकवण्यांचा पॅटर्न निर्माण केला. गेल्या सात-आठ वर्षांत शिकवण्यांचे हे पेव प्रचंड प्रमाणात फुटले. नव्या तंत्राचा आधार घेत इथल्या संस्थाचालकांनी ११ वी, १२ वीची महाविद्यालये धडाधड सुरू केली. त्या सरशी शिकवण्यांचा बाजारही चांगलाच फुलला. मोठ्या महाविद्यालयांत प्रवेश न मिळाल्यास इतर कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश देऊन राज्यभरातील विद्यार्थ्यांचा
ओघ शिकवण्यांकडे वळविण्यात आला. त्यालाही जोरदार प्रतिसाद मिळू लागल्याने गल्लो-गल्ली शिकवण्या सुरू झाल्या आहेत. त्याची उलाढाल ८० ते ९० कोटींवर आहे.
लातूरच्या जुन्या एमआयडीसीतील बंद कारखान्यांच्या गोदामात शिकवण्यांच्या फॅक्टऱ्या सुरू झाल्या आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स्, बायोलॉजी या प्रमुख चार विषयांच्या शिकवण्या जोरात आहेत.
एका विषयाचे किमान दोन ते तीन मोठे क्लासेस लातुरात चालतात. याशिवाय, विविध क्लासेसच्या माध्यमातून जवळपास ५ हजारांवर विद्यार्थी शिकवण्यांकडे वळले आहेत. कागदोपत्री नसले तरी एका विषयाचे वार्षिक शुल्क तब्बल २० हजार रुपये इतके स्वीकारण्यात येते.
अकरावीसाठी १८ तर बारावीला २० हजार रुपये भरावे लागतात़ म्हणजेच एका विषयाच्या शिकवणीवर वार्षिक १० कोटी रुपये पालक खर्च करीत आहेत. अकरावीला चार विषयांचे ३६ कोटी रुपये व बारावीला ४० कोटी म्हणजे दोन्ही वर्षांचे मिळून ७६ कोटी रुपयांपर्यंत नावाजलेल्या शिकवण्यांवर खर्च होत आहे.
अन्य क्लासेसचे आकडेही विचारात घेतल्यास ८० ते ९० कोटी रुपयांपर्यंत केवळ अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या शिकवण्यांची उलाढाल आहे़ त्यामुळेच काही क्लासेसवाल्यांकडून विद्यार्थी संख्या व शुल्क लपविण्याचे प्रकारही हा आकडा समोर येऊ नये, यासाठी होत आहेत.
पूर्ण शुल्क घेतल्यानंतर दोन ते पाच हजार रुपयांपर्यंतची पावती देण्यात येते. काही विद्यार्थ्यांना तर पावतीशिवायच थेट ओळखपत्र देऊन प्रवेश देण्यात येतो. काही क्लासेसमध्ये तर ठराविक शुल्क बँक खात्यावर जमा करून उर्वरित रक्कम थेट स्वीकारण्यात येत असल्याचे पालकांतून सांगण्यात येते.

Web Title: Teaching Pattern students siren!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.