बदल्या रद्द होऊनही शिक्षक जागचे हलेनात !
By Admin | Updated: July 30, 2014 00:49 IST2014-07-30T00:23:06+5:302014-07-30T00:49:32+5:30
बीड : माध्यमिक विभागातील वस्तीशाळा शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य असल्याचा निर्वाळा देत त्या रद्द केल्या होत्या; पण आठ दिवस उलटले तरीही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.

बदल्या रद्द होऊनही शिक्षक जागचे हलेनात !
बीड : माध्यमिक विभागातील वस्तीशाळा शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य असल्याचा निर्वाळा देत त्या रद्द केल्या होत्या; पण आठ दिवस उलटले तरीही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बदली रद्दचा आदेश म्हणजे ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी’ ठरला आहे.
जिल्हा परिषदेत वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २१ जून २०१४ पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली होती. तथापि, माध्यमिक शिक्षक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी तत्पूर्वीच समुपदेशन प्रक्रिया राबविली होती. बदलीसाठी पात्र शिक्षकांच्या यादीला अंतिम मान्यता देऊन आदेश निर्गमित करणे आवश्यक होते; पण तसे झाले नाही. याऊलट माध्यमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश परस्पर काढण्यात आले. सामान्य प्रशासन विभागातून बदल्यांचे आदेश सीईओंच्या स्वाक्षरीने जाणे गरजेचे असते; परंतु याला फाटा देण्यात आला. त्यामुळे २२ जुलै २०१४ रोजी सीईओ राजीव जवळेकर यांनी माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या सर्वच बदल्या रद्द केल्या.
दरम्यान, आदेश निघून आठ दिवस उलटले तरीही बदली होऊन गेलेले माध्यमिक शिक्षक आहे तेथेच चिकटून बसले आहेत. बदली रद्दच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सीईओंचे आदेश म्हणजे ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो...’ या म्हणीगत ठरले आहेत.
अंमलबजावणी होणारच
बदल्यांत अनियमितता झाल्याची माहिती समोर आल्याने सर्वच बदल्या रद्द कराव्या लागल्या. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. आदेश न पाळल्यास संबधित मुख्याध्यापकांवर कारवाई करावी लागेल. शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून यासंदर्भात नेमके काय झाले याची माहिती घ्यावी लागेल, असे सीईओ राजीव जवळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पाणी, नरेगाकडे लक्ष
सीईओ राजीव जवळेकर म्हणाले, शिक्षण विभागातील बदल्या, पदोन्नत्यांपेक्षा पाणीपुरवठा, नरेगा ही कामे या काळात महत्त्वाची आहेत़ शिक्षण विभागाला शिस्त आणण्याबरोबरच ग्रामीण पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे व नरेगांतर्गत होणारी कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न आहे़ (प्रतिनिधी)
आदेशच अस्पष्ट !
माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. मात्र, बदली रद्दचे आदेशच अस्पष्ट आहेत.
कारण बदली आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नावांऐवजी मुख्याध्यापकांच्या नावे काढले.
आदेशापुढे शाळेचे नावही नाही. आश्चर्याची बाब म्हणजे माध्यमिक विभागात किती शिक्षकांच्या बदल्या झाल्या? याची माहिती शिक्षण सामान्य प्रशासन, शिक्षण विभागाकडे नाही.
त्यामुळे जि़ प़ ने किती मुख्याध्यापकांना आदेश धाडले आहेत याचीही माहिती नाही़
मुख्याध्यापकांना सूचना
प्रभारी शिक्षणाधिकारी (प्रा.) एस. वाय. गायकवाड यांनी सांगितले की, माध्यमिक विभागातील शिक्षक बदल्या रद्द केल्या आहेत. जवळपास ३५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. बदल्या रद्दच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना बैठकीत दिलेल्या आहेत. याउपरही शिक्षकांना ‘रिलीव्ह’ केले नसेल तर आणखी एकदा सूचना देण्यात येतील.