जागा रिक्त असतानाही शिक्षक ठरविले अतिरिक्त !

By Admin | Updated: August 25, 2014 01:36 IST2014-08-25T01:09:40+5:302014-08-25T01:36:54+5:30

कळंब : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन करत असताना केवळ प्राथमिक शाळांवरील जागांचाच विचार करण्यात आल्यामुळे जागा रिक्त असतानाही

The teacher decided to spare while the space is empty! | जागा रिक्त असतानाही शिक्षक ठरविले अतिरिक्त !

जागा रिक्त असतानाही शिक्षक ठरविले अतिरिक्त !



कळंब : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन करत असताना केवळ प्राथमिक शाळांवरील जागांचाच विचार करण्यात आल्यामुळे जागा रिक्त असतानाही १६ शिक्षकांना बाहेरच्या तालुक्यात जावे लागणार आहे. या प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे.
शाळांना सुरूवात होऊन प्रवेश निश्चिती झाल्यानंतर प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक पदनिर्धारण प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येते. कळंब तालुक्यात ३० सप्टेंबरच्या पद निर्धारणानुसार ५८ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. सदरील शिक्षकांचे इतरत्र समायोजन करण्यासाठी २१ आॅगस्ट रोजी कळंब येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी सदरील कार्यालयाने सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील रिक्त पदांचा गोषवारा समायोजनासाठी आलेल्या शिक्षकांसमोर ठेवणे आवश्यक होते. परंतु, घडले याच्या उलट.
शिक्षकांसमोर केवळ प्राथमिक शाळांतील रिक्त पदांचा गोषवारा ठेवण्यात आला. तालुक्यातील ईटकूर, खामसवाडी, दहीफळ, मस्सा खंडेश्वरी या शाळांवरील प्रत्येकी दोन शिवाय करंजकल्ला, पिंपळगाव (डों), दाभा, आढळा, लोहटा (प.), वाघोली, नागझरवाडी, सात्रा, वडगाव (सि.), वडगाव (ज) व बाभळगाव या आठ ठिकाणी आठवीचे नवीन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळांवर नवीन शिक्षक नेमणे आवश्यक आहे. असे असतानाही समायोजन प्रक्रियेवेळी प्राथमिक शाळांतील ३९ पदे दाखविण्यात आली. माध्यमिक शाळा, नवीन आठवीचे वर्ग इतर ठिकाणची १९ जागा प्रक्रियेदरम्यान दाखविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे एकूण ५८ जागा रिक्त असताना केवळ प्राथमिक शाळेच्या ३९ जागांवरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परिणामी १६ शिक्षक तालुक्यामध्ये जागा उपलब्ध असतानाही बाहेरच्या तालुक्यात जात आहेत. त्यामुळे या गुरूजींवर एकप्रकारे अन्याय झाला असल्याचे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे. याबाबतीत तोडगा काढून शिक्षकांवरील होणारा अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी करून सदरील प्रक्रियेला संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्य चिटणीस भक्तराज दिवाणे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बारकुल, चिटणीस राजेंद्र बिक्कड, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार आदींनी विरोध दर्शविला आहे. (वार्ताहर)प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह


तालुक्यामध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही, प्रक्रियेवेळी त्या दाखविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तालुकाभरातील १६ गुरूजींना बाहेरच्या तालुक्यात जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे गटशिक्षण अधिकारी कार्यालयाने कोणत्या आधार अशा स्वरूपाचे निकष लावले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. एकूणच या प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहे.

Web Title: The teacher decided to spare while the space is empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.