मालमत्ता कराच्या वसुलीसाठी टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:15+5:302021-01-08T04:07:15+5:30

औरंगाबाद : मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली नगण्य आहे. आतापर्यंत केवळ ११ टक्केच मालमत्ता कराची वसुली झाली आहे. वसुलीसाठी ...

Task Force for Recovery of Property Tax | मालमत्ता कराच्या वसुलीसाठी टास्क फोर्स

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी टास्क फोर्स

औरंगाबाद : मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली नगण्य आहे. आतापर्यंत केवळ ११ टक्केच मालमत्ता कराची वसुली झाली आहे. वसुलीसाठी टास्क फोर्सची स्थापना केली जाणार असून, मार्चपर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत जास्त वसुली करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

मागील आर्थिक वर्षात तब्बल ११० कोटी रुपये विक्रमी वसुली मनपाला करता आली. त्यानंतर २०२०-२१ या आर्थिक वर्षात चालू वर्षाची मागणी व मागील थकबाकी मिळून ४६८ कोटी एवढी रक्कम झाली आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे १ एप्रिलपासून डिसेंबरअखेरपर्यंत या नऊ महिन्यांत केवळ ५३ कोटी रुपये इतकाच महसूल मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. हे प्रमाण अवघे ११.३७ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत ६३ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला होता. आर्थिक वर्षाचे केवळ तीन महिनेच उरले आहेत. या तीन महिन्यांत संपूर्ण उद्दिष्ट गाठायचे झाल्यास राहिलेल्या तीन महिन्यांत ४०५ कोटी रुपयांची कर वसुली करावी लागणार आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचा मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी आढावा घेतला.

यंदा व्याजात कोणतीही सूट दिली जाणार नाही

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच कराच्या वसुलीकडे लक्ष दिले जाणार आहे. त्याकरिता टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून वॉर्ड अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कराची वसुली करण्यासाठी कामाला लावले जाईल. दररोज वसुलीचा आढावा घेण्यात येईल. यावर्षी कोरोनामुळे कर वसुलीसाठी कोणतीही सवलत अथवा सूट दिली जाणार नाही. मार्च महिन्यापर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असे प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.

Web Title: Task Force for Recovery of Property Tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.