टँकरही कमी क्षमतेचे टँकर दोन अन् चालक एकच !
By Admin | Updated: February 8, 2015 00:10 IST2015-02-08T00:05:44+5:302015-02-08T00:10:28+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे

टँकरही कमी क्षमतेचे टँकर दोन अन् चालक एकच !
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, दोन पैकी एक चालक आठ ते नऊ दिवसांपासून कर्तव्यावर नसल्याने सध्या ‘टँकर दोन अन् चालक एक’, अशी परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
दोन-तीन वर्षांपासून पारगावसह परिसरामध्ये सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावते. यंदाही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच टँकर सुरू करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जलस्त्रोतही झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टँकरची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. या दोन टँकरच्या माध्यमातून गावातील २२ पॉर्इंटवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र मागील आठ ते नऊ दिवसांपासून एका टँकरचे चालक मच्छिंद्र कांबळे हे कर्तव्यावर नाहीत. येथे सध्या दोन टँकर अन् चालक एक, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्तव्यावर असलेले चाकल शेख चाँद पाशा यांच्या खांद्यावर दोन्ही टँकरची जबाबदारी येवून ठेपली आहे. एक टँकर भरून पॉर्इंटवर उभा केल्यानंतर रिकामा झालेला दुसरा टँकर पाणी भरण्यासाठी घेवून जावा लागतो. त्यामुळे चालक पाशा हेही चांगलेच हैराण झाले आहे. या सर्व गोंधळामुळे ग्रामस्थांना मात्र, टंचाईच्या झळा सोसाव्याल लागत आहेत. याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. चालक गैरहजर असल्याबाबत तहसीलसोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे. मात्र चालकाची व्यवस्था झाली नसल्याचे सरपंच डी.एन. मोटे यांनी सांगितले. (वार्ताहर)
पारगावची लोकसंख्या दहा हजाराच्या घरात आहे. २२ ठिकाणी टँकरसाठी पॉर्इंट निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे एकेका कुटुंबास तीन दिवसाआड दोनशे ते अडीचशे लिटर पाणी मिळते. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेवून किमान तेरा हजार लिटर क्षमतेचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.