तामलवाडीत घरफोडी; पोलिसांना आव्हान
By Admin | Updated: July 5, 2014 00:41 IST2014-07-05T00:05:20+5:302014-07-05T00:41:15+5:30
तामलवाडी : कटावणीने घराचे कुलूप आतील रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यासह १ लाख, ९३ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास
तामलवाडीत घरफोडी; पोलिसांना आव्हान
तामलवाडी : कटावणीने घराचे कुलूप आतील रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यासह १ लाख, ९३ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तामलवाडी (ता़तुळजापूर) येथे घडली असून, या प्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, तामलवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराशेजारी ग्रामपंचायत सदस्य अनिल रावसाहेब पाटील व त्यांचा चुलतभाऊ अंगद भाऊसाहेब पाटील यांचे समोरासमोर घर आहे़ गुरुवारी रात्री पाटील कुटुंबिय हे जेवण करुन कुलूप लावून मुलाबाळासह घराच्या छतावर झोपले होते़ मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागून भिंतीवरुन आतमध्ये प्रवेश केला़ लोखंडी कटावणीने दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. अनिल पाटील यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून साडेआठ तोळे सोने, रोख ६ हजार रुपये असा १ लाख ९३ हजाराचा माल लंपास केला. यानंतर अंगद पाटील यांच्याही घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. तिथे रोख रक्कम पळविली. व कपाटाची मोडतोड केली.
शुक्रवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. या चोरीप्रकरणी अनिल रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तामलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे हे करीत आहेत.
(वार्ताहर)
महिनाभरापासून धुमाकूळ
गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी तामलवाडी परिसरातील गावात धुमाकूळ घातला आहे. दहिवडी, सावरगाव येथे चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याचा तपास लावण्याअगोदर तामलवाडीत चोरट्यांनी पोलीस ठाण्याजवळील घरांना टार्गेट केले आहे. अगदी नजीक पोलीस ठाणे असताना चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन लाखाचा माल लंपास केला. त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांना कडवे आव्हान दिल्याचे दिसून येते.
दरोडा प्रतिबंधक पथकाची गस्त
दोन वर्षापूर्वी सांगवी मार्डी ते काटी रस्त्यावरुन मोटार सायकल अडवून चोरट्यांनी मारहाण करुन त्यात दहिवडी येथील ४० वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला. त्यावेळी तामलवाडी भागात चोऱ्या, दरोडा यासारख्या घटना घडू नये म्हणून स्वतंत्र दरोडा प्रतिबंधक पथकाची नेमणूक करुन रात्री ७ ते पहाटे ६ पर्यंत पेट्रोलिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ यासाठी दोन पोलीस कर्मचारी, १ चालक याची नियुक्ती आहे. स्वतंत्र वाहन व्यवस्था असताना चोरीच्या घटना कमी नाहीत. स्वतंत्र वाहनातून गस्तीची कामे चोख होत नाहीत. आडवळणी रस्त्यावर वाहन उभे करुन रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना अडवून चिरीमिरी घेत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. गस्तीच्या नावाखाली वाहन भागात जात नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे सावरगाव येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
कळंबमध्ये सात दरोडेखोर जेरबंद
कळंब : दरोड्याच्या तयारीत रोपवाटिकेत दबा धरून बसलेल्या सात अट्टल दरोडेखोरांना कळंब पोलिसांनी गुरूवारी रात्री जेरबंद केले़ याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून हत्यार, चटणी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे़
कळंब पोलिस ठाण्यचे पोनि चंद्रकांत सावळे यांच्या उपस्थितीत मस्सा खंडेश्वरी येथे गुरूवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक बोलाविण्यात आली होती़ पोनि सावळे हे मस्सा खंडेश्वरी येथील बैठक झाल्यानंतर बसथांब्यवर थांबले असता त्यांना गावाजवळीलच मनुष्यबळ पाटीजवळ एका रोपवाटिकेत काही लोक संशयास्पद थांबल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीवरून पोनि चंद्रकांत सावळे यांनी तात्काळ गुन्हे शाखेस माहिती देऊन पोलिस कर्मचाऱ्यांसह कारवाई केली़ आपला ताफा मस्सा-येरमाळा मार्गावरील इंगोले यांच्या धाब्याजवळ लविला़त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तेथे दाखल झाले, दोन्ही पथकाने रोपवाटिकेत दबा धरून बसलेल्या दत्ता उमराव शिंदे (३०), बन्सी बप्पा पवार (४०), सुनील छगन काळे (२२), अनिल उर्फ भरण्या शिंदे (३२ रा़वाकडी), अर्जुन सुब्राव पवार (२५ रा़मंगरूळ), सुनील शहाजी चव्हाण (२४), सुरेश माणिक पवार (३३ दोघे राक़ोल्हेगाव पिढी, ढोकी) यांना अटक केली़ या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)