स्वातंत्र्यसैनिकाचा बनावट भाचा २४ वर्षांपासून तलाठी

By Admin | Updated: January 15, 2015 00:08 IST2015-01-14T23:46:41+5:302015-01-15T00:08:21+5:30

जालना : स्वातंत्र्यसैनिकाचा भाचा असल्याचे सांगून, खोटा दस्तऐवज तयार करून २४ वर्षांपासून एक तलाठी शासकीय सेवेत कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

Talati for the Freedom of Freedom from 24 Years | स्वातंत्र्यसैनिकाचा बनावट भाचा २४ वर्षांपासून तलाठी

स्वातंत्र्यसैनिकाचा बनावट भाचा २४ वर्षांपासून तलाठी


जालना : स्वातंत्र्यसैनिकाचा भाचा असल्याचे सांगून, खोटा दस्तऐवज तयार करून २४ वर्षांपासून एक तलाठी शासकीय सेवेत कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तलाठ्याने शासनाची फसवणूक केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीकडून निष्पन्न झाल्यानंतरही गेल्या वर्षभरात काहीच कारवाई झाली नाही.
स्वातंत्र्यसैनिक कै. मनोहर धनाजी बोंद्रे यांचे पाल्य दाखवून अन्य एकाने शासकीय नोकरी मिळविली असल्याची तक्रार औरंगाबाद येथील स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष पी.एन. मोने यांनी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी भाटेपुरी येथील स्वातंत्र्यसैनिक कै. मनोहर धनाजी बोंद्रे यांचे पाल्य दत्तात्रय व त्यांची मुले अशोक ( ३२) व संजय (२९) यांना चौकशीसाठी बोलावले, तेव्हा मानेपुरी (ता. घनसावंगी) येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या पांडुरंग नरसिंहराव भोसले यांनी स्वातंत्र्यसैनिक मनोहर बोंद्रे यांचा भाचा असल्याचे दाखवत नोकरी मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूलचे प्रभारी तहसिलदार, कंत्राटी विधी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि प्रभारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त केली होती. या समितीने ९ जानेवारी २०१४ रोजी शासनाकडे पाठविलेल्या आपल्या चौकशी अहवालात पांडुरंग भोसले स्वातंत्र्यसैनिक मनोहर बोंद्रे यांचा सख्खा भाचा नाही किंवा वंशावळही नाही. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी नोकरी मिळविल्याचेही यात नमूद केले होते. या अहवालाची प्रतच ‘लोकमत’च्या हाती लागली. हा अहवाल सादर होऊन एक वर्ष लोटले तरी भोसले सेवेत कायम आहेत.
स्वातंत्र्यसैनिक मनोहर धनाजी बोंद्रे यांचे चिरंजीव दत्तात्रय. त्यांची मुले अशोक ( ३२) व संजय (२९) दोघेही दहावी नापास. गाव सोडून त्यांनी सासऱ्याचे गाव ढोकसाळ (ता. बदनापूर) गाठले. दत्तात्रय, त्यांची पत्नी, दोन मुले, त्या दोघांची पत्नी असे सारेच कुटुंब मजुरीवर जाते. सासऱ्याच्या चारएकर कोरडवाहू शेतात त्यांचे भागत नाही. दुसरीकडे कुटुंबाशी कुठलाही संबंध नसताना २४वर्षांपासून एकजण शासकीय नोकरीत असल्याची खंत दत्तात्रय यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना याबाबत विचारणा केली असता हा प्रकार आपणासमोर आलेला नाही. मात्र असे झाले असेल तर ती गंभीर बाब असून या प्रकाराची आपण तातडीने चौकशी करून कार्यवाही करू, असेही नायक यांनी सांगितले.

Web Title: Talati for the Freedom of Freedom from 24 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.