सुटीच्या दिवशीही तलाठी सज्जावर गर्दी
By Admin | Updated: July 30, 2014 00:48 IST2014-07-30T00:19:15+5:302014-07-30T00:48:57+5:30
परळी: रमजान ईदची सुटी असतानाही परळीतील माणिकनगर भागात असणाऱ्या तलाठी सज्जांवर
सुटीच्या दिवशीही तलाठी सज्जावर गर्दी
परळी: रमजान ईदची सुटी असतानाही परळीतील माणिकनगर भागात असणाऱ्या तलाठी सज्जांवर राष्ट्रीय कृषी पीक विमा काढण्यासाठी पीकपेरा व आठ अ चा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तालुक्यातील बहुतांश तलाठी सज्जांचे कार्यालय माणिकनगर भागातच आहेत. शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे या भागाला यात्रेचे स्वरुप आले होते.
तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते. पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मूग, तूर, कापूस आदी पिकांचा तातडीने पीक विमा भरुन घेण्यासाठी लगबग सुरू केली आहे.
तलाठी कार्यालयावर उड्या
पीक पेरा व आठ अ चा उतारा उपलब्ध करुन घेण्यासाठी मंगळवारी तलाठी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. नंदागौळ तलाठी सज्जांतर्गत येणाऱ्या तलाठी कार्यालयात सकाळी सात वाजल्यापासूनच गर्दी केली होती. बेलंबा तलाठी सज्जाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. दोन्ही तलाठी वेळेवर न आल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.
शेतकरी आक्रमक
शिवाजी गित्ते, भालचंद्र कांदे, महादेव गित्ते, संतोष परांडे, योगीराज गित्ते या शेतकऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांकडून अवहेलना होत असल्याचा आरोप केला. नंदागौळ, चांदापूर, वाघाळा, गोपाळपूर, बेलंबा आदी ठिकाणचे शेतकरी तलाठ्यांच्या प्रतीक्षेत होते. काही शेतकऱ्यांनी आक्रमकपणा घेत उपजिल्हाधिकारी सविता चौधरी, नायब तहसीलदार बी.एल. रुपनर यांच्याकडे तक्रारी केल्या. पाच तासानंतर तलाठी सज्जावर दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी लिहिलेला पीक पेरा व आठ अच्या उताऱ्याचे वाटप केले.
नंदागौळ व बेलंबा हे तलाठी कार्यालय ८ बाय ८ च्या खोलीत आहेत. या अंतर्गतच १५ गावांचा कारभार चालतो. (वार्ताहर)