तेरणा साखर कारखान्याच्या दुरवस्थेवरून धडा घ्या : पवार
By Admin | Updated: August 2, 2014 01:41 IST2014-08-02T01:12:29+5:302014-08-02T01:41:11+5:30
उस्मानाबाद : तेरणा कारखाना इतकी वर्ष डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली होता. दुसऱ्याच्या ताब्यात जाताच कारखान्याचे भंगार झाले.
तेरणा साखर कारखान्याच्या दुरवस्थेवरून धडा घ्या : पवार
उस्मानाबाद : तेरणा कारखाना इतकी वर्ष डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली होता. दुसऱ्याच्या ताब्यात जाताच कारखान्याचे भंगार झाले. संस्था उभी करण्यासाठी , चालविण्यासाठी अक्कल लागते, ती मोडायला डोके लागत नसल्याची टिका करीत, तेरणाच्या अवस्थेवरुन तरी धडा घ्या. काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच विकासावर भर दिला आहे. सेना-भाजपासारख्या विरोधकांनी जिल्ह्यात एकही प्रकल्प उभारलेला नसताना, आम्ही काय केले म्हणून विचारण्याचा विरोधकांना नैतिक अधिकारही नसल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
येथील दिलीप देशमुख नगरातील छायादीप लॉन्स येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, रा.प. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आ. राहुल मोटे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
जो काम करतो त्याच्याकडूनच चुका होतात. मात्र चुका कबुल करुन आम्ही पुन्हा जनसेवेत झोकून देतो. विरोधकांनी एकही काम केलेले नसताना केवळ स्टंटबाजी करुन मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. काही वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी १५ कोटीचा निधी मिळत होता. मात्र सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या उस्मानाबादकरांना दिलासा देण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष देत मागील वर्षी १२५ कोटीचा निधी दिल्याचेही ते म्हणाले. निसर्गाची साथ मिळाल्यास डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबादसाठी किती मोठे काम केले आहे याचीही प्रचिती येईल, असेही त्यांनी सांगितले. मित्रपक्षाने काम केले नसल्याच्या तक्रारी आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनाही तीव्र आहेत. मात्र तरीही जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्रित येण्याची गरज असून, कार्यकर्त्यांनीही लोकात जावून आघाडी शासनाने केलेल्या विकास कामांची माहिती पोहंचवावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रदेशाध्यक्ष तटकरे, पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांचेही यावेळी भाषण झाले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबादसह राज्यभरात डोंगराएवढे उत्तुंग काम केले आहे. मात्र ही विकासकामे लोकांपर्यंत पोहंचविण्यात आपण कमी पडल्याचे सांगत, येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित्त करण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, आ. विक्रम काळे यांच्यासह सक्षणा सलगर, प्रवीण यादव, महेंद्र धुरगुडे यांचीही यावेळी भाषणे झाली. राज्यातील इतर जिल्हा बँकांना ज्याप्रमाणे मदत झाली. तशी मदत उस्मानाबाद जिल्हा बँकेला मिळावी, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. सूत्रसंचालन अमरसिंह देशमुख यांनी केले. नगराध्यक्ष सुनिल काकडे, मसूद शेख, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, माजी नगराध्यक्ष विद्याताई गंगणे, अॅड. संदीप पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पुढचे ७० दिवस पक्षासाठी द्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे शरद पवारांच्या नेतृत्वावर व कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे आहेत. याच्या बळावरच येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादी राज्यभरात घवघवीत यश मिळवेल. त्यासाठी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढचे ७० दिवस पक्षाचे काम करण्यासाठी द्यावेत. तसा निर्धार या सभेत करा. विकास कामांच्या बळावर आपण नक्की यशस्वी होवू, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आघाडी संदर्भात उस्मानाबादमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावनांची आपण दखल घेतल्याचेही ते म्हणाले.
सौरउर्जा प्रकल्प मार्च २०१५ पर्यंत कार्यान्वित करू
उस्मानाबाद येथे सौरउर्जा प्रकल्पासाठी पूरक वातावरण आहे. त्यामुळे येथे प्रकल्प उभारावा, अशी मागणी राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यामुळेच धुळे, बारामतीनंतर उस्मानाबाद येथे प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचे टेडरिंग सुरु झाले आहे. मार्च २०१५ पर्यंत कौडगाव येथे हा प्रकल्प कार्यान्वित होईल, या माध्यमातून परिसरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.