‘स्वाईन फ्लू’ची घ्या काळजी
By Admin | Updated: February 8, 2015 00:11 IST2015-02-08T00:02:13+5:302015-02-08T00:11:33+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून, आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे. तर तिसऱ्या स्वाईन फ्लू संशयिताचाही मृत्यू झाला आहे.

‘स्वाईन फ्लू’ची घ्या काळजी
लातूर : लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून, आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे. तर तिसऱ्या स्वाईन फ्लू संशयिताचाही मृत्यू झाला आहे.
सरकारी दवाखान्यात स्वाईन फ्लूची बाधा झालेले चार रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच संशयित सहा जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या आजाराबाबत सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले असून, प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत. स्वाईन फ्लू हा इन्फ्लूएन्झा ए (एच१ एन१) या विषाणूमुळे होणारा आजार आहे. याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो.
ताप येणे, खोकला, नाक गळणे, घशाला खवखव, घसा दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, घशाला सूज येऊन तीव्र वेदना होणे, धाप लागणे आदी लक्षणे स्वाईन फ्लूने आजारी असलेल्या व्यक्तीमध्ये दिसतात. अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने लातूरच्या सरकारी दवाखान्यात तपासणी करून घ्यावी. विशेषत: पाच वर्षांखालील मुले (विशेष करून एक वर्षाखालील बालके), ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग, मधुमेह, यकृत, मुत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. अशा आजाराच्या व्यक्ती तसेच चेतासंस्थेचे विकार असलेल्या व्यक्ती, रोगप्रतिकारशक्तीचा ऱ्हास झालेल्या तसेच दीर्घकाळ स्टिरॉईड औषधी घेणाऱ्या व्यक्तींमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत असल्यास त्यांनी तातडीने सरकारी दवाखान्यात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन स्वाईन फ्लू कक्षाचे प्रमुख डॉ. राम मुंडे आणि महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी संयुक्तरीत्या केले आहे. (प्रतिनिधी)
स्वाईन फ्लू संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी दक्ष रहावे. संसर्गजन्य व्यक्तीस हस्तांदोलन करणे टाळावे. भरपूर विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधांचे सेवन करू नये, असे आवाहन आहे.
स्वाईन फ्लू टाळण्यासाठी जनतेने सतर्क रहावे. खबरदारीचे उपाय म्हणून वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. खोकताना व शिंकताना हातरुमाल नाकासमोर धरावा. नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी साबणाने हात धुवावेत. तणावापासून दूर रहावे. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.