लिलावधारकावर कारवाईचा बडगा

By Admin | Updated: May 26, 2015 00:45 IST2015-05-26T00:03:36+5:302015-05-26T00:45:42+5:30

अंबड : तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचा विरोध झुगारुन वाळु तस्क रांनी अवैध वाळू उपसा सुरुच ठेवल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द करताच

Take action on auctioneer | लिलावधारकावर कारवाईचा बडगा

लिलावधारकावर कारवाईचा बडगा

अंबड : तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचा विरोध झुगारुन वाळु तस्क
रांनी अवैध वाळू उपसा सुरुच ठेवल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द करताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने साष्टपिंपळगाव वाळूपट्टयातील लिलावधारकावर कारवाईचा बडगा उगारला.
गौण खनिज अधिकारी सामनर, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर व तहसिलदार महेश सावंत यांच्या पथकाने साष्टपिंपळगाव गोदापात्रातील सात बोटींवर जप्तीची कारवाई केली. अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान लिलावधारकाने ठरवून दिलेल्या गट क्रमांकाबरोबरच इतर गटातुन अवैध वाळू उत्खनन केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आल्याने सामाजिक बांधकाम विभागाचे अभियंता व महसुल अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागेची प्रत्यक्ष तपासणी करुन मंगळवारपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले. यावेळी गोदापात्रात आढळुन आलेल्या एका टिप्परच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांनी दिले. साष्टपिंपळगांव येथील वाळूपट्टयाचा लिलाव गोठविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचा गोदापात्रातुन करण्यात येत असलेल्या बेसुमार वाळू उपशास पुर्वीपासून तीव्र विरोध आहे. वाळू उपशावर बंदीचा ठरावही ग्रामसभेत मंजुर करण्यात आलेला आहे. अवैध वाळू उपशाविरोधात येथील ग्रामस्थांनी निवेदने, मोर्चा, रास्ता रोको अशा विविध प्रकारची आंदोलने केली. काही महिन्यांपुर्वी औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर गावातील महिलांनी केलेला रास्ता रोको लक्षणीय ठरला होता. याविषयी ग्रामस्थांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. ग्रामस्थांनी अनेक वेळा रात्रीच्या वेळी अवैध वाळू तस्करी करणारी वाहने पकडून महसुल व पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली आहेत. मात्र एवढा संघर्ष करुनही मुजोर वाळू तस्करांनी आपले अवैध धंदे सुरुच ठेवले.
रविवारी सकाळी अवैध वाळू उपसा करण्यासाठी लिलावधारकाने चार जेसीबी, पोकलंड यंत्र गोदापात्रात उतरविले. ही माहिती ग्रामस्थांना कळताच पुन्हा एकदा ग्रामस्थ व वाळुतस्करांमध्ये संघर्षाची ठिणगी उडाली. याविषयीचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले. महसुल खात्याने वृत्ताची गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उगारला. सोमवारी सकाळी गौण खनिज अधिकारी सामनर, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, अंबडचे तहसिलदार महेश सावंत, स्थानिक तलाठी, पोलीस पाटील व इतर कर्मचाऱ्यांचे पथक गोदापात्रात धडकले. यावेळी पथकास सात बोटींव्दारे अवैध उत्खनन होत असल्याचे आढळुन आले. या सातही बोट जप्त करण्यात आल्या. तसेच यावेळी गोदापात्रात उभ्या असलेल्या एका टिप्परचे कागदपत्रे, वाळू वाहतुकीची पावती तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी अधिकाऱ्यांनी गोदापात्राची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान लिलावधारकाने लिलावाच्या क्षेत्र निश्चितीसाठी लावण्यात येणारे झेंडे लावले नसल्याची गंभीर बाब समोर आली. यावेळी अधिकाऱ्यांना लिलावधारकाने ठरवुन दिलेल्या गटाबरोबरच इतर गटातुनही वाळुचे अवैध उत्खनन केल्याचा संशय आला. लिलावधारकाने किती गटातुन वाळुचे उत्खनन केले आहे याची प्रत्यक्ष पाहणी करुन मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश पथकाने सामाजिक बांधकाम विभागाचे अभियंता व महसुल अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. लिलावधारकाने इतर गटातुन अवैध वाळू उत्खनन केल्याचे स्पष्ट झाल्यास लिलावधारकाचा लिलाव रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. याबरोबरच साष्टपिंपळगांव येथील वाळुपट्टयाचा लिलाव गोठविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. (वार्ताहर)
पथकाने साष्टपिंपळगावच्या गोदापात्रात प्रत्यक्ष पाहणी करुन गोदापात्रातील सात बोंटीवर जप्तीची कारवाई केली. लिलावधारकाने लिलावाच्या ठिकाणाची मार्किंगसाठी आवश्यक असलेले झेंडे व इतर चिन्हे त्या ठिकाणी आढळुन आली नाहीत. तसेच लिलावधारकाने ठरवून दिलेल्या गटाबरोबरच इतर गटातुन वाळु उत्खनन केल्याचा संशय आल्याने सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंता व महसुल अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करुन मंगळवारपर्यंत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर लिलावधारकाने इतर गटातुन वाळु उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईबरोबरच सदर लिलाव रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
- श्रीमंत हारकर,
उपविभागीय अधिकारी
याविषयी साष्टपिंपळगावचे सरपंच अभय शेंद्रे यांनी सांगितले की, संपुर्ण गावाचा वाळु उपशास तीव्र विरोध असुन याविषयी ग्रामसभेत ठरावही मंजुर करण्यात आलेला आहे. गावाच्या गोदापात्रातुन सुरु असलेल्या अवैध वाळु तस्करीविषयी महसुल व पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले, मात्र वाळु तस्करांना जरब बसेल अशी कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही
गावातील नानासाहेब जाधव यांनी सांगितले की, बेसुमार वाळु उपशामुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाळु तस्करांनी गोदापात्राची चाळणी केली असुन यामुळे पाणी पातळी खालावली आहे. कधी काळी सुजलाम सुफलाम असणारा आमचा परिसर वाळवंट होण्याची भीती झाली आहे.

Web Title: Take action on auctioneer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.