जालना : ‘एक शाम सतीश सुदामे के नाम’ या त्रैभाषिक कविसंमेलनाने बुधवारी रात्री उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुमारे चार तास चाललेल्या या कविसंमेलनात ४० कविंनी आपल्या कविता सादर केल्या. ज्येष्ठ पत्रकार स्व. सतीश सुदामे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी गोविंदप्रसाद मुंदडा हे होते. संमेलनाचे उदघाटन डॉ. मोहम्मद बद्रोद्दीन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, नगरसेवक अब्दुल रशीद, मौलाना जमील रजवी, सय्यद इरफान, अंकुशराव देशमुख, विनीत साहनी, बाबूराव सतकर, रमेशचंद्र तवरावाला, अॅड. सुनील किनगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी, हिंदी आणि उर्दू कवींनी आपल्या रचना उत्कृष्टरित्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रारंभी या कविसंमेलनात सहभागी झालेल्या कविंचा तसेच काव्यप्रेमींचा संयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंबेकर, डॉ. बद्रोद्दीन, मुंदडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यशस्वीतेसाठी संयोजक हाफिज दुर्राणी, अब्दुल रज्जाक, शमीम जौहर, एस.बी. टिकारीया, मोहम्मद अनीसोद्दीन, मोहम्मद मतीनोद्दीन, अहेमद नूर, खिजरखान, सत्यभूषण अवस्थी, अब्दुल कादर मोमीन, नाजीम खान, सरोज भारती आदींनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास काव्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन हाफिज दुर्राणी यांनी केले. (प्रतिनिधी)
जालन्यातील त्रैभाषिक कविसंमेलन रंगले
By admin | Updated: June 27, 2014 00:13 IST