तहसीलने रोखला अवैध पाणीउपसा
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:15:36+5:302014-06-26T00:38:11+5:30
लोहारा : तालुक्यातील धानुरी येथील साठवण तलावातून होत असलेला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पथकाने शंभरावर विद्युत पंपाचे कनेक्शन बुधवारी बंद केले.

तहसीलने रोखला अवैध पाणीउपसा
लोहारा : तालुक्यातील धानुरी येथील साठवण तलावातून होत असलेला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पथकाने शंभरावर विद्युत पंपाचे कनेक्शन बुधवारी बंद केले.
जून महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यात गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावावर होत असलेला अवैध पाणी उपसा बंद करावा, असे निवेदन धानुरी ग्रामपंचायतीने १३ जूनला तहसीलदारांना दिले होते. याची दखल घेत तहसीलच्या पथकाने बुधवारी धानुरी साठवण तलावाच्या आजूबाजूला असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीवरील वीजपुरवठा बंद केला. यामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्या शंभरावर विद्युत पंप बंद पडले. एकीकडे पाऊस नाही. त्यातच कनेक्शन कट केल्याने शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका सहन करावा लागणार असला तरी या कारवाईमुळे गावाच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसापर्यंततरी मिटणार असल्याचे बोलले जात आहे. या पथकामध्ये वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पी. जी. जोगी, डी. आर. गोसावी, तलाठी जगदीश लांडगे, स्थापत्य अभियंता ई. जी. मदने यांचा समावेश होता. (वार्ताहर)
यापुढे होणार दंडात्मक कारवाई
लोहारा तालुक्यात अद्यापही पाऊस न झाल्याने तलावावरील विद्युत पंपाचे कनेक्शन तोडण्याचे काम चालू असून, तालुक्यातील सर्वच तलावावरील अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचे कनेक्शन तोडले जाणार आहे. त्यानंतर ही कोणी जोडणी केली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी दिली आहे.