खासदार विकास योजनेतून कसबे तडवळे दत्तक : अमर साबळे
By Admin | Updated: April 27, 2015 01:00 IST2015-04-27T00:54:06+5:302015-04-27T01:00:03+5:30
उस्मानाबाद : महार-मांग-वतनदार परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हे कसबे तडवळे या गावात आले होते़ त्यामुळे कसबे तडवळे हे गाव आपण खासदार विकास

खासदार विकास योजनेतून कसबे तडवळे दत्तक : अमर साबळे
उस्मानाबाद : महार-मांग-वतनदार परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हे कसबे तडवळे या गावात आले होते़ त्यामुळे कसबे तडवळे हे गाव आपण खासदार विकास योजनेतून दत्तक घेतले आहे़ या ऐतिहासिक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून, गावात स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजपा खा. अमर साबळे यांनी दिली़
धनंजय शिंगाडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या खासदार अमर साबळे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी ते बोलत होते़ यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मिलिंद पाटील, संजय निंबाळकर, संजय दूधगावकर, धनंजय शिंगाडे आदीची प्रमुख उपस्थिती होती़ साबळे म्हणाले, राजकारणापूर्वी आपण पत्रकारितेत वीस वर्षे काम केले आहे़ त्यामुळे पत्रकारांच्या समस्या, अडचणींबाबत आपण सभागृहात आवाज उठविणार आहोत़ भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले अंबवडे (जि़रत्नागिरी) हे गाव आपण खासदार विकास योजनेतून यापूर्वीच दत्तक घेतले आहे़ या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत़ महार-मांग-वतनदार परिषदेच्या निमित्ताने कसबे तडवळे गावातही डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आले होते़ या गावाचाही सर्वांगिण विकास करण्यासाठी खासदार विकास योजनेतून हे गाव दत्तक घेत असल्याचे ते म्हणाले.
रजाकाराप्रमाणेच अलिकडील काळात एमआयएम हे विषारी विचार समाजात पेरण्याचे काम करीत असल्याचा आरोपही साबळे यांनी केला. पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे उगवलेल्या या पक्षाला काही दलित संघटनेचे स्वार्थी नेते मदत करीत असल्याचे सांगत, विषारी विचार पेरणाऱ्यांना साथ देणे म्हणजे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रतारणा करण्यासारखा प्रकार असून, या अशा अभद्र युतीच्या विरोधात यल्गार पुकारण्यासाठीही हा दौरा असल्याचे साबळे यावेळी म्हणाले़ शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेवून काँग्रेसनेही ६० वर्षे सत्ता भोगली, मात्र, विकास झाला नाही़ मात्र, भाजपाचे सरकार ६० महिन्यात चांगली विकास कामे करून दाखवेल, असा विश्वासही साबळे यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)