‘कॉपीमुक्ती’साठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 00:16 IST2016-02-27T00:11:08+5:302016-02-27T00:16:00+5:30
हिंगोली : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा १ ते २९ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.

‘कॉपीमुक्ती’साठी यंत्रणा सज्ज
हिंगोली : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा १ ते २९ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण ४५ केंद्रावरून १६ हजार ७३७ विद्यार्थी परीक्षेस बसणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविले जावे, यासाठी २६ फेबु्रवारी रोजी जि. प. कन्या शाळेत बैठक घेऊन केंद्रसंचालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
१ मार्चपासून दहावीची शालांत परीक्षा सुरू होत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेत शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले असून परीक्षेसाठी लागणारे साहित्य वाटपाची प्रक्रिया सध्यासुरू आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा तसेच त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह आसन व्यवस्था केली जात असल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.
परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २६ फेब्रुवारी रोजी दुपारी केंद्रसंचालकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीस वसमत तालुक्यातून कमी संख्येने केंद्रसंचालक हजर होते. सदरची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दोन सत्रात घेतली जाणार आहे. परिक्षेदरम्यान गैरप्रकार घडणार नाही, यासाठी शिक्षण विभगाकडून नियोजन करण्यात आले आहे.