ग्रामीण भागात स्वाईन फ्लूची धास्ती; जनजागृतीची गरज
By Admin | Updated: March 5, 2015 00:00 IST2015-03-04T23:50:03+5:302015-03-05T00:00:48+5:30
राजूर : दिवसेंदिवस राज्यात स्वाईन फ्लूचा ज्वर वाढत असल्याने ग्रामीण भागात जनतेत धास्ती पसरली आहे. राजूर परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने

ग्रामीण भागात स्वाईन फ्लूची धास्ती; जनजागृतीची गरज
राजूर : दिवसेंदिवस राज्यात स्वाईन फ्लूचा ज्वर वाढत असल्याने ग्रामीण भागात जनतेत धास्ती पसरली आहे. राजूर परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. बदलत्या वातावरणाचा जनतेच्या आरोग्यावर परिणाम झाला असून सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढल्याने अनभिज्ञ नागरिकांत स्वाईन फ्लूची धास्ती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासह जनजागृती करावी, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे अचानक वातावरणात बदल झाल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामध्ये सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण अधिक आहेत. गेल्या चार महिन्यापूर्वी चांधई ठोंबरीत डेंग्यूच्या आजाराने एका बालकाचा मृत्यु झाला होता. त्यामुळे साथीच्या आजाराबाबत नागरिकांत भीती आहे.
आरोग्य विभागाने ग्रामीण भागात स्वाईन फ्लूच्या आजाराविषयी जनजागृती करण्याची मागणी होत आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ग्रामीण भागातील शाळा, विद्यालयासह गावपातळीवर लस देण्याची मागणी होत आहे. अगोदरच शेतकऱ्यासंह सर्वसामान्य जनता दुष्काळामुळे आर्थिक समस्येत आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मोहिते यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी राजूर परिसरात स्वाईन फ्लू नसल्याचे सांगितले.
मात्र नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. स्वच्छ पाणी व साबणाने हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे, खोकतांना व शिंकतांना तोेंडाला रूमाल बांधणे, भरपूर पाणी पिण्यासह झोप घेण्याचा सल्ला दिला. (वार्ताहर)