सीताफळाची गोडी महाग !
By Admin | Updated: December 14, 2015 23:57 IST2015-12-14T23:52:37+5:302015-12-14T23:57:39+5:30
राजेश खराडे , बीड पौष्टिकतेच्या सर्व गुण संपन्नतेमुळे जिल्ह्यातील सीताफळाची ओळख संपूर्ण राज्यात झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्याचे भौगोलिक चिन्हांकन म्हणून सीताफळाला

सीताफळाची गोडी महाग !
राजेश खराडे , बीड
पौष्टिकतेच्या सर्व गुण संपन्नतेमुळे जिल्ह्यातील सीताफळाची ओळख संपूर्ण राज्यात झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्याचे भौगोलिक चिन्हांकन म्हणून सीताफळाला प्राधान्यक्रम देत तसा प्रस्तावही शासनदरबारी धाडला. मात्र, दुसरीकडे अल्प पर्जन्यमानामुळे सीताफळ उत्पादन गोत्यात आले आहे. यंदा उत्पादनात सुमारे ७५ टक्के घट झाल्याने सीताफळाची गोडी महाग होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
जिल्ह्यात ५५० हेक्टरवर सीताफळाची लागवड आहे. डोंगराळ भाग अधिक असलेल्या धारूर, केज परिसरात सिताफळांची लागवड अधिक प्रमाणात झाली आहे . सिताफळाला आवश्यक असलेला ५५० ते ६५० मिमी पाऊसाची सरासरी जिल्ह्यात आहे. शिवाय कोरड्या व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे सिताफळाच्या पौष्टिकतेमध्ये भर पडते. त्यामुळे त्याची चव चाखण्यासाठी नगर, पुणे येथील व्यापारी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या दारी येऊन मालाची खरेदी करतात. यंदा पर्जन्यमान निम्म्यावरच झाले आहे. त्यामुळे फळाची योग्य वाढ न झाल्याने त्याच्या पौष्टिकतेवरही परिणाम झाला आहे. केज तालुक्यात सुमारे २२५ हेक्टरमध्ये सिताफळाची लागवड करण्यात आली असून डोंगरमाथ्यावरील परिसरात सिताफळाचे अधिकचे क्षेत्र आहे. उन्हाळ्यात सिताफळांच्या झाडांची पाने गळतात व जून ते सप्टेंबर या फळधारणेच्या कालावधीतीच होणाऱ्या पावसामुळे सिताफळाच्या पौष्टिकतेमध्ये वाढ होते. बालानगर, टिपीसात, आर्द्रासहान वाणाचे सिताफळ जिल्ह्यात आढळून येतात. सिताफळाच्या या विविधतेमुळे भौगोलिक चिन्हांकरिता प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. केज बरोबर धारूर येथे ७० बीड तालुक्यात १११ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.