‘शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य’; चिकलठाण्याने राखली सजीव देखाव्यांची परंपरा

By प्रशांत तेलवाडकर | Published: September 27, 2023 01:44 PM2023-09-27T13:44:39+5:302023-09-27T13:45:14+5:30

जुन्या शहरात एकीकडे सजीव देखाव्याची परंपरा लुप्त झाली असताना, चिकलठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मात्र ती टिकवून ठेवली आहे.

'Swarajya in Shiva's time to today's Swarajya'; Chikalthana has maintained the tradition of live performances | ‘शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य’; चिकलठाण्याने राखली सजीव देखाव्यांची परंपरा

‘शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य’; चिकलठाण्याने राखली सजीव देखाव्यांची परंपरा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहराचा एक भाग असूनही आपला ग्रामीण बाणा चिकलठाण्याने जपला आहे. याची प्रचिती गणेशोत्सवातही दिसून येते. मागील ४० वर्षांची सजीव देखाव्यांची परंपरा आजतगाजत येथील नवपिढीने जपली आहे. यंदा पुतना वध व शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य हे सजीव देखावे पाहण्यासाठी मंगळवारी सायंक़ाळी पंचक्रोशीतील आबालवृदांची मोठी गर्दी उसळली होती.
जुन्या शहरात एकीकडे सजीव देखाव्याची परंपरा लुप्त झाली असताना, चिकलठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मात्र ती टिकवून ठेवली आहे. यांत्रिकी चलदेखाव्याच्या युगात हे सजीव देखावे भाव खाऊन जात आहेत.

पुतना वध
जय मल्हार गणेश मंडळास १९९० पासून सजीव देखाव्याची परंपरा आहे. यंदा पुतना वध हा देखावा सादर केला जात आहे. यासाठी २० फूट लांबीची पुतना मावशी तयार केली असून तिचा वध बालकृष्ण करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या देखाव्यात ९ कलाकार काम करीत आहेत. देखावा बघण्यासाठी मागील तीन दिवस मोठी गर्दी उसळली होती.

शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जनजीवन कसे होते आणि आताच्या स्वराज्यात कसे जनजीवन आहे; यातील फरक सजीव देखाव्याच्या माध्यमातून ‘जय मराठा गणेश मंडळा’ने सर्वांसमोर मांडला आहे. दहीहंडे गल्लीतील हा देखावा उत्कृष्ट सजीव देखावा ठरत आहे. १५ मिनिटांच्या देखाव्यात ३५ कलाकार आहेत. यंदा या मंडळाच्या सजीव देखाव्याचे ३१ वे वर्ष आहे.

केदारनाथ देखावा- अलोट गर्दी
चिकलठाण्यातील श्री सावता गणेश मंडळाने सजीव देखाव्याची परंपरा खंडित करीत निर्जीव देखाव्याची प्रथा सुरू केली. यंदा केदारनाथ देखावा उभारण्यात आला. शहरातील २ गणेश मंडळांनी यंदा केदारनाथ देखावा उभारला आहे. मात्र, त्या तुलनेत सावता गणेश मंडळाचा देखावा भव्यदिव्य ठरत आहे. तिथे सायंकाळी मोठी गर्दी उसळत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

Web Title: 'Swarajya in Shiva's time to today's Swarajya'; Chikalthana has maintained the tradition of live performances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.