स्वॅब नमुने कन्नडचे, अहवालाचा तालुका मात्र बदलला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:04 IST2021-09-23T04:04:11+5:302021-09-23T04:04:11+5:30
कन्नड : तालुक्यातील करंजखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीसाठीचे स्वॅब नमुने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून काही दिवसांपूर्वी गायब झाले ...

स्वॅब नमुने कन्नडचे, अहवालाचा तालुका मात्र बदलला !
कन्नड : तालुक्यातील करंजखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीसाठीचे स्वॅब नमुने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून काही दिवसांपूर्वी गायब झाले होते. त्यामुळे स्वॅब नमुन्याच्या अहवालावर प्रशासकीय स्तरावरून पडदा टाकला गेला. परंतु, तब्बल वीस दिवसांनंतर प्रयोगशाळेतील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्वॅब नमुने कन्नडचे असताना त्याचा अहवाल पाठविताना तालुकाच बदलला गेला असल्याचे समोर आले आहे.
करंजखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ३ सप्टेंबर रोजी ३१ जणांचे स्वॅब आरटीपीसीआर चाचणीसाठी घेण्यात आले. ते नमुने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या दिवशी तालुक्यातील १३३ नमुने तालुका आरोग्याधिकारी कार्यालयाने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १०२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. मात्र, करंजखेडा आरोग्य केंद्राचे अहवाल प्राप्त झालेच नाही. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण लांजेवार यांनी सांगितले की, करंजखेडा केंद्राची स्वॅबची पेटी प्रयोगशाळेत अद्यापपर्यंत सापडली नाही. त्यामुळे नव्याने स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर प्रशासनाकडून वेळ मारून पडदा टाकला गेला.
प्रयोगशाळेचा असाच अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. १४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरटीपीसीआर तपासणीसाठी घेण्यात आलेले स्वॅब नमुने विद्यापीठात तपासणीसाठी पाठविले गेले. त्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. मात्र, हे नमुने पैठण ग्रामीण रुग्णालयाने संदर्भित केल्याचे त्या अहवालात दर्शविण्यात आले आहे. अर्थात सर्व नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने काळजी करण्याचे कारण नव्हते. परंतु, तालुकाच बदलला गेल्याने आरोग्य केंद्राला अहवाल शोधताना दमछाक झाली. हे अहवाल तरी बरोबर आहेत का ? असा संशय व्यक्त केला जात आहे.