छत्रपती संभाजीनगर : जटवाड्याच्या राहाळपट्टी तांडा येथील रहिवासी नितेश जनार्दन चव्हाण (३०) यांचा हर्सूल तलावात मृतदेह आढळला. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता ही घटना उघडकीस आली.
पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणारे नितेश व्यावसायिक छायाचित्रकार म्हणूनही काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मंगळवारी सकाळी स्थानिकांना हर्सूल तलावात तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. तलावाच्या सुरक्षा रक्षकाकडून माहिती मिळताच हर्सूल पोलिसांसह अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तरुणाला पाण्याबाहेर काढल्यावर नितेश यांच्या पायाला दोरी बांधलेली आढळून आली.
चार दिवसांपूर्वी नितेश छायाचित्रणाच्या कामासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. यादरम्यान त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. ही आत्महत्या आहे की अपघात, हे तपासाअंती निष्पन्न होईल, असे पोलिसांनी सांगितले. नितेश यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, तीन वर्षांची मुलगी, एक वर्षाचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे. हर्सूल पाेलिस अधिक तपास करत आहेत.