सपोनिसह चौघे निलंबित
By Admin | Updated: February 9, 2015 00:44 IST2015-02-09T00:41:35+5:302015-02-09T00:44:13+5:30
उस्मानाबाद : वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना देवूनही कर्तव्यात कसूर केल्यामुळे मुख्यालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना निलंबनाचा तडाखा बसला आहे़

सपोनिसह चौघे निलंबित
उस्मानाबाद : वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना देवूनही कर्तव्यात कसूर केल्यामुळे मुख्यालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना निलंबनाचा तडाखा बसला आहे़ ही कारवाई रविवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस अधीक्षकांनी केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेषकुमार हे शनिवारपासून मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी करीत आहेत़ वार्षिक तपासणी पूर्वी वरिष्ठांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कामकाज वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ मात्र, वारंवार सूचना करूनही पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक तपासणीदरम्यानच काहींनी कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आले आहे़ त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी रविवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याचे वृत्त आहे़ याबाबत पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही़ मुख्यालय व परिसरात मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह एक, दोन नव्हे तीन कर्मचारी निलंबित केल्याची जोरदार चर्चा असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत़
विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेष कुमार यांनी शनिवारी उमरगा व नळदुर्ग पोलिस ठाण्याला भेट देवून तपासणी केली. त्यावेळी अनेक गुन्ह्यांच्या संचिका प्रलंबित असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची त्यांनी झाडाझडती घेतली. तसेच रविवारी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात तपासणी करण्यात आली असून, येथेही काही प्रलंबित गुन्ह्यांबाबत नाराजी व्यक्त केली.