दूरध्वनी संदेशावरून वैद्यकीय अधिका-यांचे केलेले निलंबन मॅटकडून रद्द; आरोग्य संचालकांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 14:57 IST2018-01-12T12:33:51+5:302018-01-12T14:57:33+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली सायंबर यांचे दूरध्वनी संदेशावरून करण्यात आलेले निलंबन रद्दबातल ठरवत त्यांना पूर्ववत ठिकाणी सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाने (मॅट) दिले.

दूरध्वनी संदेशावरून वैद्यकीय अधिका-यांचे केलेले निलंबन मॅटकडून रद्द; आरोग्य संचालकांच्या चौकशीचे आदेश
वैजापूर ( औरंगाबाद ): येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली सायंबर यांचे दूरध्वनी संदेशावरून करण्यात आलेले निलंबन रद्दबातल ठरवत त्यांना पूर्ववत ठिकाणी सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाने (मॅट) दिले. शिवाय त्यांना निलंबित करणार्या आरोग्य संचालकांचीच चौकशी करण्याचे आदेश प्राधिकरणाने बजावले आहेत. अस्थाई वैद्यकीय अधिकार्याच्या प्रकरणात आरोग्य संचालकांच्या चौकशीच्या आदेशामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दंतशल्यचिकित्सक म्हणून डॉ. सोनाली सायंबर या गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होत्या. त्या विनापरवानगी गैरहजर राहतात, रुग्णांना सेवा देत नाहीत, अशा स्वरूपाची तक्रार आरोग्य संचालकांकडे एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने केली होती. या तक्रारीच्या आधारे कोणतीही चौकशी न करता आरोग्य संचालक डॉ. पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांना फोनवरून डॉ. सायबर यांना निलंबित करण्याचे फर्मान सोडले होते. त्यानुसार डॉ. गायकवाड यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी डॉ. सायंबर यांना तडकाफडकी निलंबित केले.
या आदेशाविरुद्ध डॉ. सायंबर यांनी प्राधिकरणाकडे दाद मागितली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांनी सुटीवर असताना निलंबन करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगताप यांना आदेश दिल्याचे प्राधिकरणाच्या नजरेत आणून दिले. त्यामुळे न्यायाधीश बी.पी. पाटील यांनी आरोग्य संचालक व जिल्हा शल्यचिकित्सकांचे फोनवरून दिलेले निलंबन आदेश रद्दबातल ठरविले. तसेच आरोग्य संचालक डॉ. पवार हे दरवेळी भूमिका बदलत असल्याने त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश आरोग्य सचिवांना दिले आहेत.