पाथरीचे उपअभियंता तरकसे निलंबित
By Admin | Updated: March 18, 2016 00:07 IST2016-03-17T23:56:35+5:302016-03-18T00:07:50+5:30
परभणी : पाथरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता जी.डी.तरकसे यांना प्रत्यक्ष कामे न करताच बिले उचलल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले

पाथरीचे उपअभियंता तरकसे निलंबित
परभणी : पाथरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता जी.डी.तरकसे यांना प्रत्यक्ष कामे न करताच बिले उचलल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आ.बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, पाथरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रभारी उपअभियंता जी.डी. तरकसे यांनी २०१४-१५ मध्ये जवळपास १६० रस्ता दुरुस्तीची तसेच इमारत दुरुस्तीची कामे न करता त्यांचे कागदोपत्री रेकॉर्ड तयार केले व कोट्यावधी रुपयांची बिले उचलून अपहार केला. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद येथील दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात आली. तसेच नांदेड येथील सा.बां विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडेही तक्रार करण्यात आली.
रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांची घरी बसूनच अंदाजपत्रके करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मग्रारोहयो विभागाच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे पत्र अधीक्षक अभियंत्यांना दिले होते. या प्रकरणी कारवाई झाली नाही. त्याबद्दल आ.दुर्राणी यांनी विधानपरिषदेत याबाबत लक्षवेधी मांडली. ही लक्षवेधी गुरुवारी सभागृहात चर्चेला आली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपअभियंता तरकसे यांना निलंबित करण्यात आले असल्याची घोषणा केली असल्याचे आ.दुर्राणी म्हणाले.
पाथरी- सोनपेठ रस्त्याची बोगस कामे करण्यात आल्यामुळे सोनपेठकरांना उपोषण करावे लागले, असेही आ.दुर्राणी म्हणाले. (प्रतिनिधी)