खून करुन पुरावा नष्ट केल्याचा संशय
By Admin | Updated: May 31, 2014 00:27 IST2014-05-30T23:54:12+5:302014-05-31T00:27:23+5:30
पूर्णा : आठवडाभरापूर्वी विवाहितेचा खून करुन पुरावा नष्ट केल्याच्या संशयावरुन पूर्णा पोलिसांनी एरंडेश्वर येथील पतीसह इतर दोघांना ताब्यात घेतले आहे.

खून करुन पुरावा नष्ट केल्याचा संशय
पूर्णा : आठवडाभरापूर्वी विवाहितेचा खून करुन पुरावा नष्ट केल्याच्या संशयावरुन पूर्णा पोलिसांनी एरंडेश्वर येथील पतीसह इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेसंदर्भात परभणी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेली माहिती अशी- एरंडेश्वर येथील राधा अनिल काळे (वय २७) ही चार महिन्यांपूर्वी हरवली होती. या संदर्भात तिच्या कुटुंबियांनी पूर्णा पोलिसांत तक्रारही नोंद केली होती. काही दिवसांत तिचा शोध लागला. आठवडाभरापूर्वी या विवाहितेचा खून करुन तिला शेतातच जाळले. या प्रकरणाची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर ३० मे रोजी पूर्णा पोलिस ठाण्याचे प्रभारी योगेशकुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी व्ही. एन. जटाळे व पूर्णा पोलिसांच्या ताफ्याने संशयावरुन घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी पोलिसांना विवाहितेच्या जळालेल्या अवस्थेतील हाडे व राख आढळून आली. घटनास्थळी वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. महिलेचे हाडाचे तुकडे आणि राख डीएनए तपासणीसाठी पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात अधिक तपासासाठी पती अनिल ऊर्फ अनंता काळे यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघांच्या शोधात पथक रवाना झाले आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा व पुरावा व नष्ट केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. (प्रतिनिधी)